राज्याचे पशुसंवर्धन, दुधविकास मंत्री महादेव जानकर हे पैसे घेऊन अधिकाऱ्यांची बदली करतात असा खळबळजनक आरोप करून चर्चेत आलेला निलंबित पशुधन विकास अधिकारी डॉ यशवंत वाघमारे याला सहा कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डॉ वाघमारे याला मागच्या आठवड्यात 9 तारखेला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज पशुवैद्यक परिषदेचे सदस्य असलेले डॉ यशवंत वाघमारे यांनी परिषदेच्या तिसाव्या सर्वसाधारण सभेत मंत्री महादेव जानकर आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप केला होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मंत्री पैसे घेतात असाही आरोप डॉ वाघमारे यांनी केला होता. त्यांचे हे आरोप बैठकीच्या इतिवृत्तात नोंद करण्यात आले होते. यानंतर मंत्री जानकर यांनी डॉ वाघमारे यांनी खात्यातर्गत चौकशीचे आदेश दिले होते. डॉ वाघमारे यांना दि 9 सप्टेंबर रोजी सेवेतून निलंबित करण्यात आले. डॉ वाघमारे हे लातूर जिल्ह्यात पशुधन विकास (विस्तार ) या पदावर कार्यरत होते.

पुण्याच्या औंधमधील रोगप्रतिबंधक विभागात पशुधन विकास अधिकारी या राजपत्रित पदावर कार्यरत असतानाही यशवंत वाघमारे यांनी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत सोलास या संस्थेच्या वतीने पशुधन व्यवस्थापण प्रशिक्षणे राबविली होती. तसा अहवाल अमरावतीच्या विभागीय आयुक्तानी शासनाला पाठविला होता. तसेच त्याचे पुरावेही सादर केले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी डॉ यशवंत वाघमारे यांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली होती. या तीन सदस्य समितीच्या चौकशीअंती डॉ यशवंत वाघमारे यांना निलंबित केले.

दरम्यान, विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी विकास प्रकल्पात सहा कोटींच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डॉ वाघमारे यांना वैजापूर येथून अटक केली. त्यांच्यासह स्वेच्छानिवृत्ती घेतलेले पशुधन उपायुक्त डॉ विवेक भारदे (57, रा पुणे) यांनाही अटक करण्यात आली आहे. या अपहार प्रकारणात सुमारे अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात शेतकरी कृषी समृद्धी प्रकल्प राबविण्यात आला. प्रकल्प संचालक गणेश चौधरी याने २०१६-१७ या कालावधीत परिचित लोकांना सुमारे सहा कोटींची कामे देऊन त्यांना 1 कोटी 34 लाखांचा फायदा करून दिला. लेखा परीक्षक दिगंबर नेमाडे यांच्या तक्रारीवरून अमरावती जिल्ह्यातील गाडगेनागर पोलिसांत दि २ जुलै २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यात पोलिसांनी डॉ वाघमारे, भारदे या दोघांना अटक केली आहे तर चौधरी याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केल्याने त्याची अटक तूर्तास टळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here