@maharashtracity

मुंबई: नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. यासाठी नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. नाट्यनिर्माते आणि नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नाट्यनिर्माते व नाट्य चळवळीसमोरील समस्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी नाट्यचळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

शासकीय नाट्यगृहात नाट्यप्रयोग आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यसंस्थांना भाडेसवलत, प्रयोगांसाठी आलेल्या नाट्यकलावंतांना शासकीय विश्रामगृहात सवलतीसह प्राधान्य, नाट्यसंस्थेच्या बसेस, टेम्पोंना टोल नाक्यांवर टोलमाफी, बस-टेम्पो पार्कींगसह नाटकाचे सेट (संच) ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करणे आदी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.

प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांच्या स्पर्धा आयोजित करुन विजेत्यांना बक्षीसांसह सवलती देण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. नाट्यनिर्मात्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here