महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याने पाणी वातपाबाबत कृष्णा लवादाने दिलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्या बैठकीत घेण्यात आला.
येदियुरप्पा यांनी आज फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी मुंबई येथे भेट घेतली आणि श्री गणेशाचे दर्शन घेतले.
पूरपरिस्थिती उदभवू नये, यासाठी धरणांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी दोन्ही राज्यांची एक उच्चस्तरिय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कृष्णा पाणी लवादाने पाणीवाटपासंदर्भात एक निर्णय दिला आहे. आंध्र आणि तेलंगणा ही दोन राज्य वेगळी झाल्यानंतर आंध्र सरकारने या लवादाकडे पाण्याच्या फेरवितरणासंदर्भात एक याचिका केली आहे. या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय आज दोन्ही राज्यांनी घेतला. आंध्रच्या वाट्याला जे पाणी आले आहे, ते त्यांनी आपसात वाटून घ्यावे, अशीच भूमिका दोन्ही राज्यांची आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.