राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तपेढ्यांना आदेश

जागतिक रक्तदान दिन विशेष

Twitter : @maharashtracity

मुंबई: जागतिक रक्तदान दिन १४ जून निमित्त राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिर आयोजित करण्यास सांगितले आहे. यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांचा डेटाबेस तयार करण्यात मदत होणार आहे. जेणेकरून रक्ताचा तुटवडा भासल्यास रक्तदात्यांना रक्तपेढ्यांकडून बोलावणे करता येण शक्य होणार आहे. दरवर्षी १४ जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. तो साजरा करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी करतात.

राज्य रक्त संक्रमण परिषदेने ८ जून २०२३ च्या पत्रातून रक्तपेढ्यांना रक्तगट शिबिरे आयोजित करण्यास आणि ऐच्छिक रक्तदात्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे. तसेच रक्तदात्याची संपूर्ण माहिती रक्तपेढीमध्ये संगणकीकृत केली जाऊ शकते. यामुळे रक्तपेढ्या विशिष्ट गटाच्या रक्तदात्यांना त्या गटाची कमतरता असल्यास त्यांना कॉल करू शकतात. सर्वसाधारण काही रक्तगटांची रक्तपेढ्यांमध्ये कमतरता भासू शकते. तर काही रक्तगट पुरेसे उपलब्ध होऊ शकतात किंवा काही रक्तगट अधिक प्रमाणातही असू शकतात. 

रक्तपेढ्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे दुर्मिळ नकारात्मक गटांची उपलब्ध करुन देणे असते. वेळोवेळी व्हॉट्सॅप आणि इतर ग्रुपवर निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त किंवा रक्तदात्यांसाठी विचारणा करणारे मेसेज भरून येतात. रक्तदात्यांची नोंदणी करताना तरुणांवर भर द्यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. दर ३ महिन्यांनी नियमितपणे रक्तदान करण्यासाठी त्यांना प्रभावित केले जाऊ शकते. यातून भावी पिढीला ही रक्तदानाचा सकारात्मक संदेश पोहचू शकतो. राज्य सरकार संचालित सेंट जॉर्ज रक्तपेढी आणि मुंबई महानगरपालिका संचालित नायर रक्तपेढींला प्रत्येकी २५००० रुपये दिले जाणार आहेत. तसेच जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यासाठी राज्यातील एकूण २७ रक्तपेढ्यांना प्रत्येकी २५००० रुपये दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. अशा कार्यक्रमातून २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा आणि रक्तदान शिबिराच्या आयोजकांचाही सत्कार करण्यात यावा, असे सुचविण्यात आले आहे. १४ जून १८६८ रोजी जन्मलेल्या कार्ल लँडस्टेनरचा वाढदिवस १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. एबीओ रक्तगट प्रणालीच्या शोधासाठी लँडस्टेनर यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यानुसार लोकांचे ‘ए’, ‘बी’, ‘एबी’ आणि ‘ओ’ रक्तगटांमध्ये वर्गीकरण केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here