@maharashtracity

कोविड चाचणीच्या एकूण १८८ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे १२८ रुग्ण
अल्फा २, केपा २४, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू
पुन्हा कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता

मुंबई: मुंबईत (Mumbai) कोरोनाची (Corona) दुसरी लाट आटोक्यात येतअसतानाच कोविडच्या डेल्टा विषाणूने (covid Delta) बाधित १२८ रुग्णांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य शासन, पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. तर मुंबईकरांसाठी ही बाब काहीशी चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची कडक पालन करावे असे आवाहन केले आहे.

परिणामी आगामी दहीहंडी, गणेशोत्सव सणावर आणखीन कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ही धक्कादायक व चिंताजनक बाब पाहता शासनाने व पालिकेने मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात आणलेल्या शिथिलतेबाबत पुनर्विचार होण्याची परिस्थिती ओढवू शकते.

कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) कार्यान्वित करण्यात आलेल्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये (Next Gen Genome Sequencing lab) पहिल्याच चाचणी तुकडीचा (फर्स्ट बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे २, केपा प्रकाराचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कोविड महामारीची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोविडचे विविध प्रकारचे विषाणू आढळून येत आहेत. त्या विषाणूंची ओळख होण्यासाठी व त्यानुसार रुग्णांवर आवश्यक उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब उभारण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ४ ऑगस्ट या लॅबचे लोकार्पण करण्यात आले.

या लॅबमध्ये दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील इलुम्निया (Ilumnia, USA) या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) (Albright Stonebridge Group, Boston) या संस्थेच्या माध्यमातून ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र मुंबई महापालिकेला दान स्वरुपात दिले आहे. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो.

असा फरक वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here