@maharashtracity

मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM Uddhav Thackeray) आज येथे सांगितले.

राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा ७६ वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआमरडीए मैदान (MMRDA ground), वांद्रे कुर्ला संकुल (BKC) येथे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास परिवहन मंत्री ॲड. अनिल परब (Transport Minister Anil Parab), परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील (Satej Patil), परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहनांची पाहणीही केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये (corona pandemic) अनेक लोकांचे प्राण गेले. त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणाऱ्या वाहनांच्या अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या हजारात आहे.

परिवहन विभागाने अद्ययावत यंत्रणा कार्यरत केल्याचे समाधान व्यक्त करून या यंत्रणेच्या वापरातून अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि जीवितहानी रोखणे हा राज्य शासनाचा हेतू निश्चितच साध्य होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

वायुवेग पथक व वाहनांविषयी

राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण ९२ वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा (Mahindra & Mahindra) कंपनीची स्कॉर्पिओ S५ या मॉडेलची ७६ वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गन (Speed gun), ब्रेथ अनालायसर (Breath Analyser) व टींट मीटर उपकरणे, इंटिग्रेटेड कॅमेरे (Integrated camera) बसविण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here