Twitter : @NalavadeAnant

मुंबई

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात १२ ते १३ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडलेल्या १८ रुग्णांच्या दुर्देवी मृत्यूची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. आरोग्यसेवा आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीला पुढील १० दिवसात म्हणजे २५ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कळवा रूग्णालयात एकाच दिवसांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका रुग्णालयातील मृत्यू उघडकीस आणले होते. आव्हाड यांनी महापालिका रुग्णालयाला भेट देऊन या दुर्दैवी घटनेकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. विरोधी पक्षाने या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून यासंदर्भातील शासन आदेश सोमवारीच जारी करण्यात आला.

या समितीत सदस्य म्हणून ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, सहसंचालक आरोग्यसेवा (राज्यस्तर), सहायक संचालक वैद्यकीय आरोग्य देखभाल दुरूस्ती पथक, भिषकतज्ञ (आयुक्त, आरोग्यसेवा द्वारे नामनिर्देशित) यांचा समावेश आहे. तर उपसंचालक, आरोग्यसेवा ठाणे मंडळ हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

कळवा रुग्णालयात घडलेल्या घटनेचा घटनाक्रम निश्चित करणे, अतिदक्षता विभाग तसेच सामान्य विभागातील डॉक्टर-कर्मचारी यांनी काय उपाययोजना केली याची चौकशी करून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी ही समिती सरकारला शिफारशी करणार आहे. या चौकशीत जे डॉक्टर- कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here