@maharashtracity
पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया
मुंबई: गरोदर अवस्थेप्रमाणे पोटाचा घेर, कोविडचा (covid) कठीण काळ आणि रोज येणाऱ्या असह्य कळा यामुळे हैराण झालेली ती महिला राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचारासाठी ओपीडीत दाखल झाली. मात्र डॉक्टरांनी गंभीरता ओळखून तिची तपासणी केली असता तिच्या गर्भाशयात सतत वाढत जाणारा ट्युमर (Tumor) असल्याचे निदान केले. त्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्या महिलेची सुटका केली. तिच्या पोटातून साडे आठ किलो वजनाचा ट्युमर काढण्यात आला.
कोविड दरम्यान इतर आजारांच्या शस्त्रक्रियेत ही गुंतागुंतीची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
शास्त्रक्रिये बद्दल बोलताना डॉ विद्या ठाकूर यांनी सांगितले कि, ३५ वर्षाची महिला राजावाडीत ओपीडीत आली होती. मात्र, तिचे पोट नऊ महिन्याच्या गरोदर महिलेसारखे दिसल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तिची तपासणी केल्यावर तो ट्युमर असल्याचे निदान करण्यात आले.
तशी कल्पना त्या महिलेला देण्यात आले. शिवाय तो ट्युमर पसरत असल्याने शास्त्रक्रियेवाचून पर्याय नसल्याचे तिला सांगण्यात आले. तिने शस्त्रक्रियेला संमती दिली. त्यावर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रक्त तिच्या शरीरात उपलब्ध नसल्याने चार युनिट रक्त तिच्या शरीरात चढविण्यात आले.
शिवाय हा ट्युमर लघुशंका प्रवाहित करणाऱ्या नलिकांना तसेच मोठ्या आतड्याला चिकटून असल्याने शस्त्रक्रिया गंभीर असल्याची कल्पना तिला देण्यात आली. ट्युमरचा घेर मोठा असल्याने मागील मोठ्या आतड्याला न दुखावता शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. यातील धोका पत्करून ही शस्त्रक्रिया तीन तासात करण्यात आली असल्याचे डॉ. ठाकूर म्हणाल्या.
ही शस्त्रक्रिया मुख्य सर्जन डॉ. अजय गुजर, डॉ. सुंदर पिल्ले अशी चार डॉक्टर, भूल तज्ज्ञ डॉ. रीना नेबू आणि परिचारिका यांनी मिळून यशस्वी केली.
ती महिला गरीब असल्याने इथे येण्याआधी दोन तीन खासगी रुग्णालयात दाखवून आली होती. मात्र, तेथील उपचार खर्च न परवडणारा असल्याने अखेर इथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे डॉ. विद्या ठाकूर म्हणाल्या.