मुंबई: रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मिठी नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वाढली होती. पाऊस सतत सुरू राहील तर क्रांतीनगर आणि परिसरात पाणी शिरणार याची धास्ती होती. महापालिकेने रहिवाशांचे स्थलांतर करण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु, पावसाचा जोर ओसरला आणि महापालिका प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला, रहिवाशांचे स्थलांतर करण्याची वेळ आली नाही.

मुंबईत पहाटे ५ वाजल्यापासून अवघ्या १२ तासात २१४.४४ मिमी पावसाची नोंद पूर्व उपनगरात करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे मिठी नदीला उधाण आले होते. पावसाचा जोर वाढता राहिला असता तर मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असती. त्यामुळे पालिका प्रशासनाने मिठी नदीलगत कुर्ला, क्रांतीनगर परिसरातील झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाला. पालिकेने तात्काळ आपल्या निर्णयात बदल केला आणि त्या राहिवंशांचे स्थलांतर थांबविण्यात आले.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत एका दिवसांत अतिवृष्टी होऊन ९४४ मिमी पाऊस पडला आणि त्याचवेळी समुद्रात मोठी भरती होती. त्यामुळे समुद्रात साडेचार मिटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्याला भिडल्या होत्या. नाले भरून वाहू लागले व मिठी नदी व अन्य नद्यांना पूर आला आणि मुंबईत सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जिवीत आणि वित्तीय हानी झाली होती.

तेव्हापासून मुंबई महापालिकेने मिठी नदीलगतचे अतिक्रमण हटवून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले. त्यामुळे नदीचा धोका निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र आज सकाळपासून पूर्व उपनगरात १२ तासात २१४.४४ मिमी इतका पाऊस पडल्याने मिठी नदी ओसंडून वाहू लागली होती.

पालिका यंत्रणेकडून नदीच्या पातळीवर डोळ्यात तेल टाकून बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. नदीतील पाण्याची पातळी २.७ मिटरपर्यन्त गेली होती. पावसाचा जोर असल्याने मिठी नदी धोक्याची निशाणी गाठण्याची शक्यता निर्माण झाली होती. मिठी नदीची धोक्याची निशाणी ३.५ मिटर आहे. मिठी नदी धोक्याची पातळी गाठण्याच्या तयारीत असल्याचे वाटू लागल्याने पालिकेने मिठी नदी लगतच्या क्रांतीनगरमधील रहिवाशांचे स्थलांतर नजीकच्या शाळेत करण्याची तयारी ठेवली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने पालिकेने आपला निर्णय बदलला आणि क्रांतीनगर रहिवाशांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here