Twitter :@maharashtracity

मुंबई: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने गेली साडेपाच वर्षे तर केंद्राने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. तसेच २० फेब्रुवारी पासून संप करुन देखील सरकारने कृती समितीला चर्चेसाठी पाचारण केले नाही. त्यामुळे संतप्त अंगणवाडी कर्मचारी उद्या मंगळवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे व आहार व इंधनाचे दर, अंगणवाडीचे भाडे वाढवणे, आहार, इंधन, अंगणवाडीचे भाडे, टी.ए.डी.ए आदी थकित देयके इत्यादी मुद्द्यांवर आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नसल्याने अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. हे कर्मचारी गेली दोन वर्षे सातत्याने लढा देत असूनही मागण्या मान्य करण्याच्या मुद्यावर आश्वासनांच्या पलिकडे या कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले.

कोरोना काळात केलेल्या सेवेची दखल घेऊन शासन मानधन वाढवेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला जात आहे. मात्र प्रत्येक वेळेस निराशाच पदरात पडली. प्रश्न सोडवण्याऐवजी शासनाने अंगणवाड्या दत्तक देण्याची कल्पना काढून खाजगीकरणाकडे पावले टाकायला सुरवात केली आहे. या परिस्थितीत दुसरा कोणाताही मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे शेवटी नाईलाजाने कृती समितीच्या वतीने हा संप जाहीर करावा लागला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी संपाची नोटिस देऊनही तोडगा निघावा यासाठी हालचाल केली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून राज्यातील सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर उतरल्या आहेत.

या संपाच्या पहिल्या दिवसापासून आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, आयसीडीएस विभागीय उप आयुक्त कार्यालये तसेच अंगणवाडी प्रकल्प कार्यालयांवर मोर्चे काढून तीव्र निदर्शने केली. संप सुरू होण्याअगोदर सरकार कृती समितीला चर्चेसाठी निमंत्रित करेल असे वाटत असताना अपेक्षाभंग झाल्याने ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here