मानधन वाढ आणि निवृत्ती वेतनाची मागणी मान्य

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीची माहिती

Twitter: @maharashtracity

मुंबई: मानधन वाढ आणि निवृत्ती वेतनाची मागणी मान्य झाल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीकडून माहिती देण्यात आली. त्यामुळे तुर्तास संपातून माघार घेत असल्याची घोषित करण्यात आले. विधान सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी सभागृहत केली होती.

राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात मानधन वाढ, निवृत्तीवेतन, पोषण ट्रॅकर ऍप अशा विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली होती. यावेळी अंमलबजावणी शिवाय माघार नसल्याची घोषणाच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीकडून करण्यात आली होती.

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. मात्र, मंगळवारी काही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संपातून माघार घेत असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. यात मानधन वाढ आणि पेंशन देण्याची मागणी मान्य केली असल्याचे सांगण्यात आले.

मानधनात १५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संपातून माघार घेण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीकडून सांगण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसांच्या आंदोलनाची प्राधान्याने दखल घेऊन प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत मंगळवारी केली होती.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे ८३०० रु. तर मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा सुमारे ५८०० रु., मदतनीसांना दरमहा सुमारे ४२०० मानधन मिळते. महाराष्ट्र सरकार त्यांना मानसेवी समजते. सरकार त्यांच्याशी मालक सेवक असलेले नाते मान्य करीत नाही. त्यांना कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही संरक्षण आणि लाभ महागाई भत्ता मिळत नाही.

अंगणवाडी सेविका व मदतनीस सरकारच्या कर्मचारी आहेत. शासन त्यांचे मालक आहेत. त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याला मानधन म्हणता येत नाही. तर ते वेतन आहे. भारतीय संविधानानुसार शिक्षण आहार, पोषण विषयक घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता त्यांची नेमणूक केली आहे. त्यांची पदे ही शासनाने निर्माण केलेली पदे असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्ते अंगणवाडी कर्मचारी करत होते.

मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदान सोडायचे नाही असा निर्धार आंदोलनकर्त्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीकडून सांगण्यात आले होते. मात्र मानधन वाढ आणि निवृत्ती वेतन प्रश्न सुटल्याने सायंकाळी संपातून माघार घेण्यात आली.

प्रश्न तातडीने सोडवा – अजित पवार

राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दिनांक २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here