@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेने कोविड जनुकीय सूत्र (Genome Sequencing) निर्धारणांतर्गत ८ व्या फेरीतील ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी मुंबई (Mumbai) क्षेत्रातील २८० नमुन्यांची तपासणी केली असता २४८ नमुने ८९% ओमायक्रॉन, २१ नमुने ८% डेल्टा डेरिव्हेटीव्ह, ११ नमुने ३% डेल्टा व्हेरिअंटसह इतर उपप्रकारांनी बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
या ११ नमुन्यांपैकी २ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ (Delta Variant) या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे (Health Department) देण्यात आली आहे.
त्यामुळे आता कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (BMC Commissioner I S Chahal) यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांच्या मार्गदर्शनानुसार ‘कोविड – १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. ८ व्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.
कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.
२८० चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
८ व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २८० रुग्णांपैकी ३४% अर्थात ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तसेच,२८% म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत.
तर २५% म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ८% म्हणजेच २२ रुग्ण हे ‘० ते २०’ या वयोगटातील; तर ५% म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.
चाचण्या करण्यात आलेल्या २८० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १३ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, २ नमुने ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ४ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ७ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ (Omicron) या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत
‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (vaccination) आधारे विश्लेषण केले असता, २८० पैकी ७ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागले. यापैकी २ रुग्णांना ऑक्सिजनची (Oxygen) गरज भासली, तर १५ रुग्णांना अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.
एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि ५ रुग्णांना अतिदक्षता (ICU) कक्षात दाखल करावे लागले.