पोटनिवडणूक कार्यक्रमात अंशतः बदल

By अनंत नलावडे

Twitter: @nalavadeanant

मुंबई: पुढील महिन्यात होऊ घातलेल्या इयत्ता बारावी तसेच पदवीच्या परीक्षा लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात अंशतः बदल केला आहे. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी आता २७ फेब्रुवारी ऐवजी रविवार, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल, अशी माहिती आयोगाने बुधवारी दिली. पोटनिवडणुकीच्या उर्वरित कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

निवडणूक आयोगाने १८ जानेवारीला कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार होते. मात्र, याच दरम्यान ज्या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे तेथे बारावी आणि पदवीच्या परीक्षा होणार असल्याची बाब जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणली. या पार्श्वभूमीवर आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला.

आयोगाने याआधी जाहीर केलेला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३१ जानेवारीला अधिसूचना जारी करण्यात येईल. ७ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. तर ८ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत १० फेब्रुवारी अशी आहे. पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होऊन २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी हाती घेऊन निकाल घोषित केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here