@maharashtracity

मुंबई: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे धावत्या मुंबईत सर्वानाच कामावर व अन्य ठिकाणी वाहनाने जाण्याची घाई असते. त्यामुळे रस्त्यावरील ‘सिग्नल’ तोडून पुढे जाण्यात खासगी वाहनांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. मात्र बेस्ट परिवहन विभागाच्या बसगाड्या, वाहनांनी फक्त ५ वेळाच ‘सिग्नल’ तोडल्याची माहिती समोर आली आहे.  वास्तविक, बेस्ट उपक्रम हा शिस्तप्रिय आहे.

बेस्ट कर्मचार्यांना प्रशासनाकडून अधिकारी, कर्मचारी यांना कामावर असताना शिस्तीचे, कडक नियमांचे पालन करण्याबाबत धडे दिले जातात. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात बस वाहकाकडे बस तिकिट प्रवाशांना वितरित करताना कमी पैसे जमा झाल्यास त्याला खिशातून सदर रक्कम भरून चोख हिशोब द्यावा लागतो. 

तसेच, तिकीट वितरित करताना रक्कम वाढल्यास त्या वाढीव रकमेबाबतही स्पष्टीकरण द्यावे लागते. एवढेच नव्हे तर बस वेळेपूर्वी स्टॉपला नेल्यास अथवा बसला पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाल्यास त्याची सर्व कारणे द्यावी लागतात. प्रवाशांशी उद्धटपणे वागल्यास व त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात येते व त्यात तो बस चालक दोषी आढळून आल्यास त्यावर नियमाने कारवाई करण्यात येते.  

बेशिस्तपणे वागणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रसंगी निलंबित करण्यात येते. एवढी कडक शिस्त बेस्ट उपक्रमात आहे. 

असे असताना बेस्ट परिवहन (BEST) विभागातील काही बसचालकांनी जानेवारी २०२० ते मे २०२१ या १७ महिन्यांच्या कालावधीत फक्त ५ वेळा ‘सिग्नल’ तोडून बस पुढे नेल्याची कामगिरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सिग्नल तोडल्याबद्दल गेल्या १७ महिन्यात ५ ई चलन (e- challan)  बेस्ट परिवहन विभागाला पाठवण्यात आले होते. या ५ ई चलनच्या माध्यमातून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here