घाटकोपर – मानखुर्द उड्डाणपुलाच्या नामकरणावरून झाला होता गदारोळ

@maharashtracity

मुंबई: घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे काम येत्या २५ जुलै रोजी पूर्ण होणार आहे. या उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचेच नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती स्थापत्य समिती ( उपनगरे) अध्यक्ष स्वप्नील टेम्बवलकर यांनी दिली आहे.

दि २८ जून रोजी याच उड्डाणपुलाच्या नामकरणाच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत गदारोळ घातला होता. तसेच, सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांना दोष देत आणि घोषणाबाजी करीत सभात्याग केला होता. त्यामुळे ती बैठक चांगलीच गाजली होती.

घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे काम सुरू असताना शिवसेना, भाजप नगरसेवकांनी या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर मध्यंतरी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही या पुलाला सुफी संतांचे नाव देण्याची मागणी केली होती व त्यावरून सेना – भाजपात राजकीय वाद निर्माण झाले होते.

मात्र पालिका प्रशासनाने, या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून आणखीन काही कालावधी लागणार असल्याने एवढ्यात या पुलाचे नामकरण करणे शक्य होणार नाही, असे वादग्रस्त उत्तर दिल्याने त्याचे पडसाद आज स्थापत्य समिती ( उपनगरे) च्या बैठकीत उमटले होते. त्यावेळी, भाजप सदस्यांनी सकारात्मक उपसूचना मांडून हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती ; मात्र पालिकेचे अभिप्राय नकारात्मक असल्याचे कारण देत समिती अध्यक्ष स्वप्नील टेम्बवलकर यांनी तो प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय दिला.

त्यामुळे भाजप सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’अशा घोषणा देत गदारोळ घातला. प्राशसन व सत्ताधारी शिवसेना यांचा निषेध व्यक्त करीत सभात्याग केला होता.

दरम्यान,स्थापत्य समिती ( उपनगरे) अध्यक्ष स्वप्नील टेम्बवलकर यांनी शुक्रवारी या उड्डाणपुलाच्या ठिकाणी भेट देऊन पुलाच्या कामाची पाहणी करून सखोल माहिती घेतली. सदर पुलाचे काम हे २५ जुलैपर्यन्त पूर्ण होणार असून या पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुलाबाबतची माहिती

हा उड्डाणपूल शिवाजी नगर जंक्शन ते मोहिते पाटील जंक्शनपर्यन्त २.९० किमी लांबीचा आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे शिवाजी नगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राउंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील हे परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहेत. तसेच,पालिकेने प्रथमच २४.२ मिटर सेगमेंट कास्टिंग तयार करून सदर पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच, या उड्डाणपुलामुळे नवी मुंबई, पनवेल, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची २५ मिनीटे वेळेची बचत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here