@maharashtracity
धुळे: कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचे (Possible third wave of corona) जगभरात संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे धुळे (Dhule) जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यावसायिकांनी दिलेल्या वेळेतच दुकाने बंद करून सहकार्य करावे. नागरिकांनीही नियमित मास्क वापरावा. व्यावसायिकांनी ग्राहकांना नियम पालन करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (DM Jalaj Sharma) यांनी केले आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांशी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सुभाष कोटेचा, जयश्री शहा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी दिसत असली, तरी अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. जिल्हा महामार्गांवरील जिल्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्य शासनाने व्यावसायिकांना दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसायास अनुमती दिली आहे. त्यानंतरही अनेक दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर आहे. शनिवार, रविवारी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन होत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस यंत्रणेने कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
क्षेत्रीय अधिकार्यांनी निर्धारित वेळेत आस्थापना बंद होतील, अशी दक्षता घ्यावी. त्यासाठी व्यापारी पेठेत नियमितपणे पाहणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथके गठीत करावीत अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी केली.
शिरपूरात व्यापार्यांना समज
शिरपूर (Shirpur) शहरात दुकाने बंद करण्याच्या कारणावरून एका व्यापार्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शुक्रवारी येथील कार्यालयात व्यापार्यांची बैठक झाली.
तहसीलदार आबा महाजन म्हणाले की, नगरपालिकेच्या पथकाने ज्या दुकानाला गुरूवारी सील लावले होते ते काढण्यात आले. व्यापार्यांनी नियम पाळावे. मेनरोडवर हातगाडी चालकांनी एका ठिकाणी न थांबता कॉलनी परिसरात जावे. पोलिस प्रशासन व महसूल विभागाची बैठक घेऊन हातगाडीचालकांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असेही ते म्हणाले. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.