मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान असून अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी शासनही प्रयत्नशील असून गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे एका विशेष कार्यक्रमात बोलताना दिली.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या पात्र १६२ यशस्वी गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. मात्र आज प्रत्यक्षात गिरणी कामगारांना चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. २०२० मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे ३५०० यशस्वी गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांना येत्या तीन महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून ०१ जुलै २०२३ पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कायदे हे सर्वसामान्यांसाठी असावेत, ही शासनाची भूमिका असून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासनाकडे येण्याची वेळ येवू नये, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवित आहोत. आतापर्यंत राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. गिरणी कामगारांना सदनिका खरेदी करण्यासाठी मुंबई बँकेने कर्ज दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी बँकेचेही आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here