@maharashtracity

मुंबई: मुंबईत झालेल्या बनावट लसीकरणानंतर (fake vaccination) पालिकेने आता अधिकची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. बनावट लसीकरणात कुप्यांचा पूर्नवापर केला गेला. त्यामुळे सोसायटी आणि खासगी लसीकरण केंद्रांच्या व्यवस्थापकांना अहवाल पाठविण्याचा तसेच कुप्यांवर स्टिकर्स लावण्याची दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यातून बनावट लसीकरण टाळले जाईल असे ही सांगण्यात आले.

मुंबई पालिकेच्या सूचनेनुसार खासगी लसीकरण केंद्र जर हाउसिंग सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी जात असतील तर त्यांनी संपूर्ण अहवाल योग्यरित्या ठेवून पालिकेला सादर करणे आवश्यक आहे. शिवाय, कुप्यांचा पुर्नवापर टाळावा म्हणून त्यावरील जो स्टिकर असेल तो काढून त्याची रजिस्टरमध्ये नोंद करुन चिकटून ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर, त्या कुप्या वैद्यकीय पद्धतीने पूर्णपणे नष्ट करुन वैद्यकीय कचऱ्यात फेकण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

खासगी लसीकरण केंद्रांना प्रत्येक कुप्यांचा अहवाल महापालिकेला द्यावा लागणार आहे. यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये वापरल्या जाणार्‍या लसीचे स्टिकर सुरक्षित ठेवावे लागतील जेणेकरुन लस कुठे दिली गेली याची माहिती पालिकेला सहज मिळू शकेल.

मुंबईत बनावट लसीकरणाची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. हे रोखण्यासाठी पालिकेने नुकत्याच नवीन आणि अधिकच्या सूचना सर्व खासगी आणि पालिका लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. बनावट लसीकरणाच्या तपासात रिकाम्या लसीच्या कुप्यांमध्ये द्रव्य भरले होते. हा गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून कुपीवर लावलेल्या स्टिकर आणि बॅच क्रमांकाची नोंद करावी लागणार आहे. मुंबईत आतापर्यंत अशा ४ लाख ८८ हजारांहून अधिक कुप्या वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे यातील कुप्या नियमानुसार नष्ट करण्यात आल्या का याचा आता शोध घेणे सुरु झाले आहे. महानगर पालिकेने याबाबत सर्व रुग्णालयांकडून माहिती मागवली आहे.

स्टिकर चिकटविल्याने कोणत्या बॅचमधील कुपी कधी वापरली गेली? या लसीचे डोस कोणाला दिले गेले? ही माहितीदेखील सहज उपलब्ध होईल. यातून बनावट लसीकरण टाळले जाईल.

  • डॉ. मंगला गोमारे, पालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here