@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) जिल्ह्यात कोरोना (corona) साथीची दुसरी लाट ओसरुन दैनदिन रुग्णसंख्या शुन्यावर स्थिरावली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यातच तिसर्‍या लाटेचा धोकाही कायम आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी. त्याचबरोबर सिरो सर्वेक्षणाचे नियोजन करावे. रात्रीच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगत दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने भारतीय वैद्यकीय परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी.

वैद्यकीय महाविद्यालयानेही प्रयोगशाळा सुसज्ज ठेवत अहवाल तातडीने देण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्प तातडीने कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रकल्पांसाठी वीज कंपनीने वीजपुरवठा करावा. ऑक्सिजन प्रकल्प तांत्रिक समितीकडून प्रमाणित करून घ्यावे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

रात्री आठनंतर दुकाने, आस्थापना सुरू राहणार नाहीत याची दक्षता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांनी घ्यावी. विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here