स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक
@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) तालुक्यातील तरवाडेे गावातील दुहेरी हत्त्याकांडाचा (double murder) अवघ्या 36 तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अर्थात एलसीबीला (LCB) यश आले. पोटच्या मुलानेच आईचा आणि आजीचा निर्घृन खून केल्याची माहीती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Dhule Police) मारेकर्याला अटक केली आहे.
धुळे तालुक्यातील तरवाडे गावातील चंद्रभागाबाई भावराव माळी (वय 65) आणि तीची मुलगी वंदना गुणवंत महाले (वय 45, रा.अडगाव ता. एरंडोर जि. जळगाव) या दोघींचा दि. 23 मेे रोजी रात्री त्या झोपेत असतानाच निर्घून खून झाला होता. या दुहेरी हत्याकांडाने तरवाडे गावासह परिसर हादरला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात सुरेश भावराव माळी (वय 42) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
वंदनाच्या चारित्र्याबाबत तिचा पती गुणवंत महाले आणि मुले दिनेश (वय 22) व हितेश (वय 19, तिघे रा.अडगाव ता.एरंडोल जि.जळगाव) यांना संशय होता. यामुळे वदंनाबाईचा पतीसह मुलांसोबत वारंवार वाद होत असल्याने ती आई चंद्रभागाबाईकडे तरवाडे गावात रहायला आली होती. गेल्या तीन महिन्यांपासून वंदनाबाई ही आईकडेच राहत होती.
लहान मुलगा हितेश महाले याला आईसह आजीवर राग होता. ही माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना समजली. त्यानुसार त्यांनी हितेशला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी बोलते केले असता हितेशने दुहेरी हत्याकांडाची कबूली दिली.
त्याने सांगितले की, आई वंदना हिच्या चारित्र्यामुळे आणि वर्तणुकीमुळे संपूर्ण कुटूंब त्रस्त झाले होते. या त्रासाला कंटाळून दि. 23 मे रोजी मध्यरात्रीनंतर तो आडगाव येथून तरवाडे येथे दुचाकीने आलो. लोखंडी सळईने आजी चंद्रभागाबाई आणि आई वंदना हिच्या डोक्यात जोरदार वार करुन दोघींची हत्या केली.
हितेशने गुन्ह्यात वापरलेेली एम.एच.18 ए.बी. 8428 क्रमांकाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर लोखंडी सळईचा शोध घेत आहेत.
पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक योगेश राऊत, हे.कॉ.संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, रफिक पठाण, पोना योगेश चव्हाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, कलमेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सुनिल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.