@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची खेळाडू कु. कीर्ती हिरास्वामी गुडलेकर व जगदिश मोहन रोकडे या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे.
याबद्दल तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
३री २३ वर्ष आतील फ्रिस्टाईल (Free style), ग्रीकोरोमन (Greco-Roman) व महिला राष्ट्रीय कुस्ती (Women National Wrestling) स्पर्धा १६ ते १९सप्टेंबर दरम्यान अमेठी, उत्तरप्रदेश येथे संपन्न होणार आहे.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणी स्पर्धा इंदापूर जि, पुणे येथे ५ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. त्यात धुळे जिल्हा तालीम संघाची खेळाडू कु कीर्ती हिरास्वामी गुडलेकर हिने ५० किलो वजन गटात व जगदीश मोहन रोकडे याने ५५ किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्त्या करून सुवर्ण पदक मिळविले.
राष्ट्रीय स्पर्धेत दोघे खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. राष्ट्रीय खेळाडू व पंच त्रिलोक गुडलेकर यांची कीर्ती पुतणी आहे. अतिशय सामान्य व कष्टकरी घरातील हे खेळाडू आहेत.
कीर्ती गुडलेकर व जगदीश रोकडे यांच्या यशाबद्धल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संजय अग्रवाल, आदींनी अभिनंदन केले.