असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटकडून मागणी
Twitter: @maharashtracity
मुंबई: यवतमाळ जिल्ह्यात निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, या प्रकरणात त्वरित लक्ष घालून डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्यात तरतूद करावी अशी मागणी केली आहे.
निवेदनात डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांबाबत केंद्राने कडक कायदा करावा अशी मागणी केली आहे. तसेच, देशभरातील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा केंद्रीय पातळीवर तपशील ठेवावा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संबंधित माहिती याची मदत होईल. तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांची संख्या मर्यादित असावी अशीही सूचना करण्यात आली आहे.
यवतमाळ येथील घटनेचे पडसाद राज्यासह मुंबईतही उमटल्याचे दिसून आले. मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टर शुक्रवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम करत आहेत. यवतमाळ येथे डॉक्टरांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना असून डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब यावेळी निदर्शनात आणून दिली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कँडल मार्चही काढण्यात आला.