आधीच थॅलेसेमिया; त्यात एचआयव्ही बाधित

Twitter : @maharashtracity

मुंबई: रितेश (नावात बदल) हा सात वर्षाचा मुलगा चार महिन्याचा असल्यापासून थॅलेसेमिया आजाराशी लढत होता. त्याला बालवयातच गंभीर थॅलेसेमियाचे (thalassemia) निदान झाले. या आजारात दर तीन ते चार आठवड्यांनी रक्त संक्रमण आवश्यक असल्याने ते करत असताना त्याला एचआयव्हीची (HIV) बाधा झाली. आधीच थॅलेसेमिया त्यात एच आय व्ही बाधा असे असूनही डॉक्टरांनी रितेशला पूर्णतः बरे केले. दोन्ही आजार असलेल्या रुग्णाला बरे करण्याचे हे भारतातील पहिलेच उदाहरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

रितेशच्या कुटुंबाने बालरोगतज्ज्ञ डॉ. विंकी रुघवानी यांच्याशी संपर्क साधला. डॉ. रुघवानी रितेशच्या लहानपणापासून आरोग्याची काळजी घेत होते. वारंवार रक्तसंक्रमण केल्याने केवळ महत्वाच्या अवयवांमध्ये जास्त प्रमाणात लोह जमा होत नाही तर रुग्णांना रक्तसंक्रमणाशी संबंधित विविध संसर्ग होण्याचा धोका असतो. रितेशच्या बाबतीतही तसेच झाले. रितेश एकुलता एक आहे. थॅलेसेमियाला आवश्यक असलेल्या रक्त संक्रमण करत असताना त्याला दुर्दैवाने एचआयव्ही संसर्ग झाला. पालकांसाठी हा धक्काच होता. यातून त्याचे कुटुंब हेलावून गेले. या पूढे त्याला आयुष्यभर एचआयव्हीसाठी अँटी रेट्रो व्हायरल थेरपी घ्यावी लागणार होती. दरम्यान, त्याला लगेच एचआयव्ही थेरपी सुरु केली. उपचारांचा नियमित पाठपुरावा सुरु करण्यात आले असल्याचे डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.

डॉ. रुघवानी यांनी पुढे सांगितले की, या रक्त विकारावर अॅलोजेनिक हेमॅटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचारात्मक उपचार आहे. मात्र यासाठी आदर्श स्टेम सेल दात्याची गरत असते. यात शक्यतो कुटुंबातील सदस्याचा एचएलए घटका जुळण्याची शक्यता असते. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) मदतीने थॅलेसेमिया आणि सिकलसेल सेंटर, नागपूर येथे आयोजित शिबिरात मोफत एचएलए मॅचिंग करण्यात आले. सहसा भांवडांतील एचएलए जुळण्याचे प्रमाण ३० टक्के असते. मात्र, रितेशला कोणी भावंड नव्हते. तर पालकांचे एचएलए जुळण्याचे प्रमाण निव्वळ १ टक्के आहे.

या ठिकाणी चमत्कार झाला. रितेशच्या वडिलांचे एचएलए १०० टक्के जुळले. त्यामुळे त्याला त्वरित धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील बोन मॅरो ट्रान्सप्लांट (bone marrow transplant) तज्ज्ञ डॉ. शांतनु सेन यांच्याकडे पाठविण्यात आले. जगात फार कमी एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये स्टेम सेल प्रत्यारोपण झाले आहे. भारतात अद्याप अशी नोंद नसल्याचे सांगण्यात आले. डॉ. शंतनु सेन यांनी पुरेशा थेरपीसह प्रत्यारोपण केले. एखाद्या लहान मुलाला एका वेळी दोन गंभीर आजार असून त्यातून बरे हाणारे हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे डॉ. रिंकी रुघवानी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here