By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉमर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, संजय कुटे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, प्राजक्त तनपुरे यांनी विजपुरवठयाअभावी पीकांचे होत असलेले नुकसान याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात ट्रान्सफॉमर्सचा साठा तयार करण्यात येईल. आज प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवर लोड आल्याने ट्रान्सफॉर्मर जळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ट्रान्सफॉर्मरसाठी रिप्लेस आणि रिपेअर असे धोरण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात व्हेंडर बेस निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मदत घेण्यात येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत नुकतीच एक प्रीबीड बैठक झाली आहे. दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने काही वेगळे उपाय करता येतील का, याबाबतही विचार करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, २०२५ पर्यंत ५० टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सध्या १५ लाख २३ हजार ४२६ ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज देयक गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये भरलेले नाही. त्यांना थकीत देयके भरा अशा सूचना नाहीत तर चालू बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

रब्बी हंगामात कृषी वाहिन्यांमधील भार वाढून महत्तम मागणीच्या कालावधीत काही वेळेसाठी या वाहिन्या अतिभारीत होतात आणि तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होतो. हा तांत्रिक बिघाड दूर करुन, नादुरुस्त रोहित्र बदली करुन वीज पुरवठा कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्यात येतो. अजंग उपकेंद्राची स्थापित क्षमता १० एमव्हीए असून तेथील अतिभारीत वाहिन्यांवरील भार कमी होण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS)अंतर्गत अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे ऊर्जा रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here