@maharashtracity
मुंबई: ज्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकाराखाली शाळा प्रवेशासाठी प्रवेश निश्चित झाला आहे, त्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता पात्र खासगी विना-अनुदानित शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव असतात.
या राखीव जागांवर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येऊन प्रवेश दिले जातात. यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी राज्य स्तरावर लॉटरी काढण्यात आली होती. त्यानुसार निवड झालेल्या बालकांना शालेय प्रवेशासाठी ३० जूनपर्यन्त प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र, आता ही मुदत ९ जुलैपर्यन्त वाढविण्यात आली आहे.
निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी पालकांना प्रवेशाबाबत एस. एम. एस. पाठविण्यात आलेले आहेत. पाल्याच्या शिक्षणाची संधी जावू नये, यासाठी निवड यादीतील सर्व पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्याचे ९ जुलै २०२१ पूर्वी प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे / बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि व्हॉट्सअप / ई-मेलद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
तसेच शाळांनी देखील प्राथमिक स्तरावर प्राप्त झालेली प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी समितीला दाखवून पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावेत. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांची यादी आरटीई पोर्टलवर उपलब्ध आहे.
त्या यादीतील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही ९ जुलै २०२१ पूर्वी पूर्ण करण्यात यावी, असे महापालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.