By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: काही सरकारी अधिकार्‍यांनीच देवस्थान भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे अशी धक्कादायक माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उत्तरातून आज विधानसभेत पुढे आली.

देवस्थान जमीनी विक्रीचे मोठे रॅकेट (racket of selling of lands belonging to Devasthan) राज्यात अस्तित्वात आहे असे स्पष्ट करतानाच भ्रष्टाचार निर्मूलन पथकाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री फडणवीस यांनी यावेळी विधानसभेत केली. देवस्थानच्या जमीनी पुन्हा मिळाव्यात, तसेच भविष्यात पुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठी शासन कायदा करील असेही यावेळी त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थानच्या भूमी हडप करण्यात आल्या आहेत, या प्रकरणात खोटे गुन्हे नोंदवून तक्रारदाराचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यात येत आहे याकडे लक्ष वेधले. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, असे नमूद करून, या गंभीर प्रकरणी कालबद्ध मर्यादेत चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

बीड (Beed) येथील राष्ट्रवादीचे सदस्य प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील ९४ देवस्थानच्या जमिनी हडप झाल्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली. रईस शेख यांनी वक्फ मंडळाची (Waqf board) भूमीही बळकावण्यात आल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) यांनी हा घोटाळा मोठा आहे, यामध्ये अनेक मोठे लोक सहभागी आहेत, असा आरोप केला.

भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देवस्थानच्या बक्षीस देण्यात आलेल्या भूमी विकल्या गेल्या आहेत. त्यावर घरपट्टीही लागली आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA govt) काळात बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असतांना त्यांनी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. अशा प्रकारचा कायदा सरकार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी सरकार कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट केले.

या चर्चेवर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, हिंदू देवस्थानच्या भूमी अवैधरित्या विकल्या गेल्या असतील, तर त्यावर कारवाई करण्याचे दायित्व सरकारचे आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना १२ डिसेंबर २०२१ या दिवशी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून देवस्थानच्या जमिनी हडप करण्यात आल्याची माहिती दिली होती. बीडसह अन्य जिल्ह्यांतूनही अशा प्रकरणे पुढे येत आहेत. या प्रकरणी सरकार चौकशी करील, असे आश्वासन उत्तरात गृहमंत्री फडणवीस यांनी दिले.
End

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here