@maharashtracity
मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील रायगड, सांगली, रत्नागिरी आदी जिल्ह्यात पूरस्थिती व दरड कोसळण्यासारख्या दुर्दैवी दुर्घटना घडल्या. त्यामध्ये मोठी जीवित हानी झाली होती. पूरस्थित व दरडग्रस्त अशा महाड (जिल्हा – रायगड), चिपळूण (जिल्हा – रत्नागिरी), सांगली (जिल्हा – सांगली) येथील भागात दिवसरात्र मदत कार्य करुन परतलेल्या मुंबई महापालिकेच्या ४०० अधिकारी, कर्मचाऱयांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
गुरुवारी पहिल्याच दिवशी १४५ कर्मचाऱ्यांची तपासणी मरोळ स्थित सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यात आली. महाड, चिपळूण आणि सांगली येथे अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होणे व दरड कोसळणे अशा दुर्घटना घडल्या होत्या.
याची गंभीर दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या सुचनेनुसार, मुंबई महापालिकेतील घनकचरा, आपत्कालीन विभाग, पाणीपुरवठा, मलनि:सारण विभाग आदी विभागातील तब्बल ४०० कर्मचार्यांचे पथक मदत कार्यासाठी यंत्रसामग्रीसह महाड, चिपळूण व सांगली या ठिकाणी पाठविण्यात आले होते.
महाड येथे ११५, चिपळूण येथे २१७ आणि सांगली येथे ८९ असे ४२१ अधिकारी – कर्मचारी मदत कार्यासाठी गेले होते. मदत कार्य पूर्ण करुन हे पथक मुंबईत परतले आहेत.
या सर्व अधिकारी – कर्मचा-यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची सूचना आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी केली आहे. त्यानुसार उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर सुरु झाले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी व त्यांच्या सहकारी पथकाने २५ जुलै ते १ ऑगस्ट २०२१ दरम्यान महाड येथे स्वच्छता मोहीम राबविली होती. सदर पथक २ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईमध्ये परत आल्यानंतर या पथकाची आज गुरुवारी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली.