By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: नगर जिल्ह्यातील रामवाडी प्राणघातक हल्ले, तसेच तोडफोड, जातीवाचक शिवीगाळ या प्रकरणाची फेरपडताळणी करून अफझल शेख याच्या अटकपूर्व जामिनाच्या विरोधात न्यायालयात अपील केले जाईल, तसेच या स्थानिक पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना उत्तरात दिले.

भाजप सदस्य नितेश राणे यांनी रामवाडी परिसरात अनेक वर्षांपासून दलित समाजातील लोकांवर अत्याचार, महिलांचा विनयभंग आणि देवतांच्या छायाचित्रांची विटंबना असे प्रकार अफझल शेख याच्या नेतृत्वाखाली असे प्रकार होत आहेत याबाबत लक्षवेधी सूचना दिली होती. अत्याचारांच्या घटना घडूनही पोलिसांनी धर्मांध अफझल शेख व इतरांवर कठोर कारवाई केली नाही, याकडे लक्ष वेधताना अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. ‘‘छत्रपती संभाजीनगरचे स्टेटस ठेवले म्हणून हे प्रकरण घडले. गृहविभागाने लक्षवेधीच्या उत्तरात दिलेली माहिती वस्तुस्थितीला धरून नाही असेही राणे म्हणाले.

यावेळी कॉंग्रेस सदस्य बाळासाहेब थोरात यांनी नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांना आक्षेप घेतला. लक्षवेधीतील माहिती हिंदु आणि मुस्लिम यांच्यात सामाजिक तेढ वाढवणारी आहे. याला माझा विरोध आहे. या प्रकरणाला धर्माचे स्वरूप देऊ नये. आपल्याला राज्य शांततेने चालवायचे आहे असे थोरात म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या अफझल शेख यांचा संबंध आहे त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद आहेत. भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद असतांना त्याला अटक व्हायला हवी होती; त्याच्या अटकपूर्व जामीनाबाबत पोलिसांनी अपील का केले नाही हे पाहिले जाईल. देवतांची विटंबना केली ती छायाचित्रे नितेश राणे यांनी दाखवली आहेत. यामध्ये अत्याचार केल्याचे स्पष्ट दिसते. मात्र या या प्रकरणाला हिंदु मुस्लिम जातीय तेढ असे स्वरूप येणे योग्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here