इंडियन कॅन्सर सोसायटी घेणार पुढाकार

Twitter: @maharashtracity

मुंबई: कर्करोग, त्यावरील प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याचे महत्त्व याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीने (आयसीएस) महिनाभर मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून कर्करोगाच्या शुश्रुषेतील अंतर कमी करण्याचे उद्दीष्ट सोसायटीने समोर ठेवले आहे. यासाठी आयसीएसने वोक्हार्ट फाऊंडेशनशी सहकार्य केले असून आगामी तीन महिन्यांत तोंडाच्या कर्करोगासाठी १ लाख लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

या तपासणीसाठी वोक्हार्ट फाऊंडेशनच्या २०० मोबाइल व्हॅनच्या मोठ्या राष्ट्रव्यापी नेटवर्कचा वापर करण्यात येईल. इतर कार्यक्रमांमध्ये तपासणी करण्याच्या महत्त्वाबाबत एका चित्रपटाचे प्रदर्शन करण्याचा समावेश आहे. आयसीएसच्या उगम आणि इतर म्युच्युअल सपोर्ट ग्रुपचे सदस्य असलेल्या कॅन्सर सर्व्हाव्हयर्सनी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. विविध उपक्रमांतून कर्करोग जागरूकता आणि तपासणी उपक्रमांचे आयोजन केले गेले.

आयसीएसने सी. के. हांडू शिष्यवृत्ती आणि संशोधनाची व्याप्ती आणि निकष वाढवून ती पुन्हा सुरू केली आहे. कर्करोग संशोधन, उपचार आणि नियंत्रण यांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या मागचा उद्देश आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी आयसीएस परळच्या आवारात एका तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. तिथे तोंड, स्तन आणि सर्व्हिकल यांसारख्या सामान्य कर्करोगांसाठी स्थानिक रहिवाशांची तपासणी करण्यात आली.

यावेळी विवेक फणसळकर यांनी सांगितले की, कर्करोग तपासणीच्या चाचण्या या कर्करोगापूर्वीची स्थिती शोधण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. लवकर निदान झाल्यास वेळेवर निदान आणि उपचार मिळण्याची शक्यता वाढते. तर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय विश्वस्त उषा थोरात यांनी कर्करोगावर सखोल संवाद आणि कृतींना चालना देण्याची इच्छा व्यक्त केली.

वोक्हार्ट फाऊंडेशन सोबतचा तपासणीचा उपक्रम हा कर्करोगाचा लवकर शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे कर्करोगातून बचावण्याची आणि उपचाराचा खर्च कमी होण्याची शक्यता वाढेल. तसेच कर्करोगास कारणीभूत असलेल्या पदार्थांना टाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कर्करोगासंबंधीत गोवा राज्यात आणि पश्चिम बंगाल आणि तेलंगाणामधील निवडक जिल्ह्यांमध्ये तेथील राज्य सरकारांच्या मदतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन कॅन्सर सोसायटी कर्करोगापासून वाचण्यासाठी लोकांना सतत जागरुक ठेवेल असेही या वेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here