@maharashtracity

मुंबई: भांडुप (प.), येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहात उभारण्यात आलेल्या २० बेडच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागामुळे भांडुपकरांची कायमची चिंता मिटली आहे. नवजात शिशूला गंभीर आजारातही तात्काळ उपचार मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे आता भांडुपकरांना खऱ्या अर्थाने आजारी नवजात शिशुबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.

भांडुपमधील (Bhandup) एखाद्या नवजात शिशुला काही गंभीर आजार झाल्यास त्याला आवश्यक उपचार करण्यासाठी थेट पालिकेच्या केईएम (KEM Hospital) अथवा नायर रुग्णालयात (Nair Hospital) रात्री-अपरात्री न्यावे लागत असे. त्यामुळे त्या पालकांना खूप त्रास होत असे. विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असे. त्यातूनही त्या शिशूला वेळीच उपचार न मिळल्यास त्याच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता असते.

या नव्याने उभारलेल्या २० बेडच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले.

याप्रसंगी, आ. रमेश कोरगावकर, माजी खा. संजय दिना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पूर्व उपनगरामध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू करण्याची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आज पूर्ण झाली आहे, असे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी यावेळी केले. आज कोरानाचे (corona) स्वरूप बदलत असल्यामुळे सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. यापुढे आता लसवंत व्हा, असे महापौरांनी म्हटले आहे.

यावेळी शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांनी, सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभाग (ICU) सुरू करण्यात आल्यामुळे बऱ्याच वर्षापासूनची मागणी या कामामुळे पूर्ण झाली असल्याचे सांगितले.

तसेच, सद्यस्थितीत डायलिसिस रुग्णांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी महापालिकेने दोनशे-तीनशे बेडचे डायलिसिस सेंटर (Dialysis centre) सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here