महापालिकेने संयोजकांकडून कागदपत्रे मागवली

कोल्हापूर: श्री कोल्हापूर महालक्ष्मी महाउत्सव समितीकडून शिरोली टोल नाका, सुवर्णभुमी लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या महा उत्सवात मंत्र, तंत्राने आजार बरे करणारे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. सजग नागरिकांनी यावर आक्षेप घेतल्याने कोल्हापूर महापालिकेने याची गंभीर दखल घेतली असून महाउत्सव आयोजक समितीकडून अशा पद्धतीने इलाज करणाऱ्या भोंदूना कशी परवानगी दिली, याबाबतचे कागदपत्रे मागविले आहेत.

कोल्हापूर येथे रविवार 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीमध्ये महाउत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महाउत्सवामध्ये डोकेदुखी, पोटदुखी, पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा दिर्घ आजारांवर दिव्य मंत्रानी दैविक प्रार्थना करणेकामी सर्वांना निमंत्रण करत असल्याबाबत जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. आरोग्यविषयक चुकीचे अशास्त्रीय पध्दतीने वैद्यकिय उपचाराविषयी जाहिरातबाजी करणे कायदेशीर गुन्हा होवू शकतो, याकडे शहरातील सजग नागरिकांनी महापालिकेचे लक्ष वेधले.

त्याची दखल घेवून महापालिकेने संयोजकांकडे खुलास मागवला आहे. कार्यक्रमाचे नियोजन कशाच्या आधारे करण्यात आले आहे, या कार्यक्रमासाठी रितसर सर्व परवानगीची कागदपत्रे महापालिकेत त्वरित सादर करण्याबाबत संयोजकांकडे मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here