माजी आमदार कृष्णा हेगडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

@maharashtracity

मुंबई: नामांकित ब्रँड्सच्या दुकानांमधून वस्तू खरेदी करताना ग्राहकांची वैयक्तिक माहिती विचारली जाते. यात मोबईल नंबरपासून ते जन्मतारखेपर्यंतचा इत्थंभूत तपशील गोळा केला जातो. मात्र, अशा प्रकारे देण्यात येणारी माहिती ग्राहकांना डोकेदुखी ठरु शकते. ग्राहकांच्या गोपनीयतेच्या अधिकारावर (encroachment on privacy of consumers) हे आक्रमण असून या विरोधात कारवाई करण्याची मागणी माजी आमदार व भारतीय कामगार सेनेचे सचिव कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

मोठ्या स्टोअर्समधून तसेच फुड चेन्स, मॉल्स, आणि नामांकित ब्रॅन्ड्सचे आऊटलेट्समधून खरेदी करताना वैयक्तिक माहिती विचारल्याच्या तक्रारी ऐकायला येतात. अशी खरेदी करताना ग्राहकांकडुन सर्रास मोबाईल नंबर, नाव तसेच जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती विचारली जाते.

ग्राहकांना हा खरेदीच्या प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले जाते. मात्र ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील अपरिचित व्यक्तींच्या हाती लागल्यास सायबर क्राईम (cyber crime) घडू शकतात. सध्या सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांकडे पाहता आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्याची ही प्राथमिक पायरी ठरु शकते, अशी भिती कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केली आहे.

ग्राहकांची ही वैयक्तिक माहिती व्यावसायिक कंपन्यांना विकली जात असल्याची शक्यता हेगडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन या पद्धतींना आळा घालावा, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here