भाजपा आ आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विनंती
@maharashtracity
मुंबई: कोकणात गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival in Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेऊन केली.
शेलार म्हणाले, कोकणात (Konkan) गणेशोत्सवाठी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), वसई (Vasai), विरार (Virar) या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणातील गावी जातात.
यावर्षी कोकण रेल्वेने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली. बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते.
त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ मध्ये खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या, याची आठवण शेलार यांनी करून दिली.
त्यामुळे याही वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व जास्तीच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांना केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.