डोंगर उतारावरील जमिनी संपादित करू नये – प्रांताधिकारी यांना निवेदन
@maharashtracity
By मिलिंद माने
महाड
किल्ले रायगडावर आणि परिसरात गेल्या काही वर्षापासून रायगड प्राधिकरण आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे हातात घेण्यात आली आहेत. मात्र या विकासकामांना डोंगर उतारावरील जमिनी संपादित करण्याचा डाव स्थानिक प्रशासन आणि जमीन विक्रेत्यांनी रचला असून याबाबत रायगडवाडी, हिरकणीवाडीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेत अशा जमिनी संपादित केल्या जावू नयेत याकरिता महाड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
छ. शिवाजी महाराज यांची राजधानी आणि शिवभक्तांचे आदराचे स्थान असलेल्या किल्ले रायगडचा विकास गेल्या काही वर्षापासून शासनाच्या माध्यमातून हातात घेण्यात आला आहे. गडावरील ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याबरोबरच गड आणि परिसरात शिवभक्तांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गडाच्या परिसरात वाहनतळ, शौचालये, वीज व्यवस्था, निवासाची सुविधा आदी सुविधा करण्यासाठी जमिनींची आवश्यकता आहे. मात्र गडाचा परिसर डोंगर उतारावरील असल्याने याठिकाणी जागा मिळणे कठीण झाले आहे. शिवाय येथील स्थानिक ग्रामस्थांकडे मुळातच अल्प जमीन असल्याने आणि शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी सहजासहजी जमीन देण्यास राजी नाहीत.
असे असले तरी कांही पडीक जमिनी धनदांडग्या लोकांनी आपल्या फायद्यासाठी घेतल्या आहेत. शासकीय अधिकारी आणि स्थानिक जमीन विक्रेत्यांना हाताशी घेवून या पडीक आणि डोंगर उतारावरील जमिनी शासनाला संपादित करायला लावून मलिदा खाण्याचा उद्योग सुरु केला आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आता आक्षेप नोंदवत नव्या संपादनाला विरोध दर्शवला आहे. महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना याबाबत निवेदन सादर करून फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
पाचाड येथे शिवसृष्टीला संपादित केलेल्या जागेपैकी जवळपास ४० टक्के जागा ही तीव्र उतारावरील आहे. याबाबत देखील कांही नागरिकांनी आक्षेप घेतला होता. मात्र रायगड प्राधिकरणाने सारवासारव करत हीच जागा संपादित केली आहे. यातील बहुतांश जागा ही स्थानिक शेतकऱ्यांकडून अल्प दरात घेवून शासनाला प्रती गुंठा दराने विकली आहे. अशाच प्रकारे आता मौजे रायगडवाडी मधील सर्व्हे नंबर १५८/०, ७८/१अ, ७८/१ब, ७८/२ब, ७८/२ ड, आणि इतर क्षेत्र असलेल्या जमिनी वाहनतळासाठी संपादित करण्याची हालचाल सुरु होताच स्थानिक ग्रामस्थांनी सदर जागा ही डोंगर उतारावरील असून यावर आपण वाहनतळ कसे उभे करणार असा प्रश्न केला आहे.
यामुळे या भूसंपादनाचा निवाडा रद्द करण्यात येवून रक्कम अदा केली जावू नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन अजित औकीरकर, लहू औकीरकर, प्रभाकर सावंत, महेश शिंदे, निलेश तळवटकर हे उपस्थित होते. याबाबत ग्रुप ग्रामपंचायत निजामपूरने देखील हरकत घेतली आहे. तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली रायगड परिसरातील जमिनीचा सर्व्हे करूनच या जमिनी संपादित केल्या जाव्या, अशी मागणी सरपंच सौ. प्रेरणा प्रभाकर सावंत आणि उपसरपंच गणेश औकीरकर यांनी केली आहे.
किल्ल्याच्या परिसरात खोदकाम झाल्यास नैसर्गिक सौंदर्याला बाधा
किल्ले रायगड परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण परिसर आहे. या परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या परिसरात जमीन खरेदी व्यवहार वाढले आहेत. यामुळे जमीन खरेदीदार जमिनींचे सपाटीकरण करण्यासाठी खोदकाम करत आहेत. अशाच पद्धतीने डोंगर उतारावरील जागा शासनाने घेतल्यास ज्या सोयी- सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. त्याकरिता खोदकाम करावे लागेल आणि भविष्यात हा परिसर धोकादायक बनण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्यातच अनेक भागात खोदकाम होत असल्याने जमिनींना भेगा पडण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. यामुळे अशा जमिनी काय कामाच्या असा प्रश्नदेखील ग्रामस्थांनी केला आहे. या जमिनींबाबत झालेला निवडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“ज्या जमिनी शासन किल्ले रायगड परिसरात संपादित करत आहे त्या जमिनी जमीन विक्रिते आणि अधिकारी यांच्या संगनमतातून होत आहेत. यापूर्वी देखील अशाच पद्धतीने डोंगर उतारावरील चुकीच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. पुन्हा तीच चूक शासन करत आहे.”
– अजित औकिरकर, स्थानिक ग्रामस्थ
“यापूर्वी संपादित झालेल्या जमिनींबाबत आपणास अधिक माहिती नाही मात्र कांही भाग डोंगर उतारावरील आहे. मात्र सद्य स्थितीत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करून योग्य पद्धतीच्या जमिनी संपादित केल्या जातील.”
– प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी, महाड