@maharashtracity
महाड: महाराष्ट्र राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ पासून सरकारी सेवत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना (New National Pension Scheme) लागू केली. ही योजना अन्यायकारक असल्याने सर्वांसाठी जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून राज्यभर आंदोलने केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महाड महसूल कर्मचाऱ्यांकडून महाड येथे २२ सप्टेंबर रोजी बाईक रॅली (bike rally by employees of revenue department) काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करावी या मागणी करता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक कर्मचारी समन्वय समिती यांच्या माध्यमातून विविध आंदोलने केली जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बाईक रॅली आयोजित करून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाड महसूल विभागातील विविध संघटनानी देखील बाईक रॅली आयोजित केली होती. या बाईक रॅलीमध्ये महाड उप विभाग महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष रवींद्र भोसले, महाड तालुका महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष राम पवार, राज्य सरकारी कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष सतीश आंग्रे, महाड तालुका तलाठी संघटना अध्यक्ष सूग्राम सोनवणे व कर्मचारी सहभागी झाले होते.