भुयारी मार्गात मासळी विक्रेते आणि खाजगी प्रवासी वाहनांचा तळ

वाहतूक कोंडीच्या समस्येवर अधिकारी सुस्तच

@maharashtracity

महाड (रायगड): मुंबई – गोवा महामार्गाच्या (Mumbai – Goa Highway) चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. तर शहराजवळ असलेल्या भुयारी मार्गात विक्रेते, मासळी विक्रेते आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी तळ ठोकला असल्याने कायम वाहतूक कोंडी होत आहे.

या वाहतूक कोंडीबाबत (Traffic congestion) स्थानीक पोलीस प्रशासन, महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्त असल्याने कायम वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महाडजवळ नातेखिंड आणि चांभारखिंड या ठिकाणी दोन मोठे भुयारी मार्ग (Underpass) ठेवण्यात आले आहेत. तर महाडजवळ (Mahad) नातेखिंड ते हॉटेल विसावापर्यंत उंची वाढवून महामार्गाचे काम सुरु आहे. नातेखिंड याठिकाणी किल्ले रायगडाकडे (Raigad fort) आणि महाड शहरात जाण्यासाठी तर चांभारखिंड गावाजवळ महाड शहरातील प्रवेश मार्ग आहे.

या दोन्ही ठिकाणी कायम वाहनांची वर्दळ असते. महाड एस.टी. बसस्थानकात (ST Bus depot) येणाऱ्या बसेसदेखील चांभारखिंड येथील भुयारी मार्गाचाच वापर करणार आहेत. खाद्य पदार्थ, भाजी, आणि फळ विक्रेते, मासळी विक्रेते, रिक्षा चालकांनी या दोन्ही भुयारी मार्गात कब्जा केला आहे. यामुळे अवजड वाहने, शिवशाही बसेस आदी वाहने भुयारी मार्गातून तसेच सर्व्हिस मार्गावर काढताना मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

एका बाजूला विक्रेते तर दुसऱ्या बाजूला रिक्षा चालकांनी उभ्या केलेल्या रिक्षा, कामावर जाताना उभ्या केलेल्या दुचाकी यामुळे याठिकाणी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

चांभारखिंड येथे महाड एस.टी. महामंडळाच्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी खाजगी वाहने एस.टी. महामंडळाच्या रस्त्यावर बिनदिक्कत उभ्या करून प्रवासी गोळा करण्याचे काम करतात. हीच अवस्था महाड नातेखिंड येथील महाड – रायगड मार्गावर झाली आहे. याठिकाणी देखील भुयारी मार्गात दोन्ही बाजूला भाजी, फळ विक्रेते आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे.

किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या वाहनांना आणि किल्ले रायगडकडून महाड शहरात येणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत आहे. याठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. महामार्ग कामासाठी आलेल्या वाहनांना देखील याठिकाणी सामान उतरवताना अडचण होते. महामार्ग पूर्ण होण्याआधीच याठिकाणी विक्रेत्यांनी बस्तान बसवल्याने भविष्यात याठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणारा आहे.

अनियोजित कामामुळे महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. महाड शहराजवळ अद्याप मूळ महामार्ग सुरु झालेला नाही. यामुळे नातेखिंड येथून थेट नडगापर्यंत अद्याप पर्यायी मार्गाचाच वापर केला जात आहे. पर्यायी मार्ग देखील एकाच दिशेनेच सुरु असल्याने ये – जा करणारी वाहने एकाच पर्यायी मार्गावरून धावत आहेत. त्यातच अनेकवेळा विविध ठिकाणी महामार्ग ठेकेदार कंपनीकडून बदल केले जात आहेत. याचा त्रास देखील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

मच्छीची मागणी करतय तरी कोण ?

मुंबई – गोवा महामार्गालगत एस.टी स्थानकाच्या रस्त्यावर यापूर्वी मासळी विक्रेते बसत होते. महाड शहरात मासळी विक्री मार्केट केलेले असताना देखील बाहेरून येणाऱ्या मासळी विक्रेत्यांनी कधी पालिका हद्दीत, कधी एस.टी. स्थानकाचा रस्ता आणि आता महामार्ग भुयारी मार्गात बस्तान बसवले आहे.

मासळी विक्रेत्यांना अधिकाऱ्यांचे, पोलिसांचे भय नसल्याने लोकांच्या त्रासाबाबत यांना काहीही देणेघेणे नाही. याबाबत बोलताना एका मासळी विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हायवे डीपार्टमेंट अधिकारी इथे येवून फुकट मच्छी घेऊन जातात असे सांगितले. नक्की कोणत्या विभागाचे अधिकारी मच्छी घेवून नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहेत, याचा शोध घेवून कारवाई होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here