Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात शुक्रवारी १५ गोवर रुग्णांची नोंद झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्यात आता एकूण ९४० एवढ्या गोवर रुग्णांची (measles patients) नोंद झाली आहे. गुरुवारी राज्यातील एकूण गोवर संख्या ९२५ एवढी सांगण्यात आली होती. तर मुंबईत ६ रुग्णांची गोवर रुग्णांची नोंद होऊन मुंबईत आता पर्यंत ४४२ एकूण गोवर रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारपर्यंत मुंबईत ४३६ एवढे एकूण गोवर रुग्ण होते.
दरम्यान, मुंबईतील ५६ ठिकाणावरील उद्रेकातून ४७९३ संशयित असल्याचे सांगण्यात आले. यात एम पूर्व, एल आणि एच पूर्व वॉर्डसह इतर १६ वॉर्ड असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यात मालेगाव मनपा, भिवंडी, ठाणे मनपा आणि जिल्हा, वसई – विरार मनपा क्षेत्र, पनवेल मनपा, नवी मुंबई मनपा, औरंगाबाद मनपा, पिंपरी – चिंचवड मनपा, बुलढाणा, मीरा – भाईंदर, रायगड, जळगाव मनपा, धुळे मनपा तसेच धुळे अशी १७ ठिकाण गोवरसाठी संवदेनशील असल्याचे सांगण्यात आले. यामुळे संवेदनशील भागावर विशेष लक्ष देण्याच्या सुचना राज्य गोवर टास्क फोर्सकडून (Task Force) देण्यात आल्या आहेत.
राज्यात जिल्हा स्तरावर ११ लाख ५५ हजार ५७० लसीचा साठा उपलब्ध असून विभागीय स्तरावर १ लाख १९ हजार २५० लसीचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवरची लस देण्याचे आवाहन राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.