वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी बुधवारी दिले.

दरम्यान, महाजन यांनी बुधवारी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाची गोवर साथरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या (Haffkin Institute) व्यवस्थापकीय संचालक सुमन चंद्रा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आयुक्त राजीव निवतकर, अवर सचिव महादेव जोगदंड, मुंबई महानगपालिकेचे (BMC) अधिकारी डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री महाजन यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) आणि सर्वोपचार रुग्णालय येथे गोवर (Measles) प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्या-त्या जिल्ह्यातील गोवर रुग्णांची संख्या, विलगीकरण (Isolation) व्यवस्था, खाटांची संख्या, औषधांची उपलब्धता, आदीबाबत माहिती घेतली. अधिकाधिक लसीकरण होईल, यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. गोवर प्रतिबंध बाबत जनजागृती व्हावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. सध्या राज्यातील विविध सर्वोपचार रुग्णालयात असणाऱ्या रुग्णाची संख्या, त्यांच्यावरील उपचार स्थिती आदींची माहिती त्यांनी घेतली.

यंत्रसामुग्री-औषध खरेदीसाठी निधी वेळेत खर्च व्हावा

हाफकिन इन्स्टिट्यूटला विविध यंत्रसामुग्री आणि औषध खरेदीसंदर्भात दिलेला निधी विहीत वेळेत खर्च होईल, यासाठी नियोजन करा. औषध खरेदी अथवा यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया झाली नाही तर त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होऊ शकतो. केवळ तांत्रिक बाबींमुळे निधी परत जाणार नाही, याची दक्षता घ्या, असेही निर्देश गिरीष महाजन यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here