कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांची प्रस्तावाला मान्यता
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यातील कामगारांच्या मुलांना डॉक्टर होता यावे, यासाठी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक विभागाच्या बैठकीत केली. यावेळी राज्यातील प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी मंत्री डॉ. खाडे यांनी मान्यता दिली. यावेळी खाडे यांनी उद्योग असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार रुग्णालय बांधण्याच्या सूचना केल्या.
राज्य सरकारमार्फत प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. नागपूरच्या बुटीबोरी एम.आय.डी. सी. येथे ई.एस.आय.सी.रुग्णालय बांधण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर ५० हजारांपेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या जिल्ह्यातही रुग्णालये बांधता यावीत, यासाठी उपाय करण्याचे निर्देश कर्मचारी राज्य विमा मंडळास दिले. राज्यातील कामगार रुग्णालयात कॉर्डियॉक ऍम्बुलन्स देण्याबरोबरच ई.एस.आय.सी. रुग्णालयाचे फायदे कामगारांना माहिती व्हावे यासाठी प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कामगारांच्या तक्रार निवारणासाठी एक हेल्प लाईन सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, कामगारांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णालयात ब्लड बँक, पथालॉजी यासह हृदय शस्त्रक्रिया आदी सोयी सुविधा यासह ई.एस.आय.सी. रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यावर मंत्री डॉ. खाडे यांनी भर दिला. कामगार रुग्णालये ही सरकारच्या जागेवर बांधली असल्याने या रुग्णालयाची दुरुस्ती करण्यात अडचणी येत असून यावर लवकर तोडगा काढण्याच्याही सूचना केल्या. मोडकळीस आलेली कामगार रुग्णालयांच्या ठिकाणी अद्ययावत नवीन रुग्णालये बांधण्याची मंजुरी या बैठकीत देण्यात आली. कामगार रुग्णालयांना सर्वांत जास्त महसूल महाराष्ट्रातील कामगारांकडून जात आहे. कामगारांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरीय समिती नियुक्त करण्याचे आदेश मंत्री डॉ.खाडे यांनी दिले. या समितीवर लोकप्रतिनिधी समवेत शासनाचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त राहणार असून सेवा सुविधा देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.