जिल्हाधिकारी शर्मांकडे तक्रार
शिवसेनेकडूनही स्वच्छतेची हमी
धुळे: साक्री विधानसभा मतदार संघाच्या शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित मंगळवारी दुपारी एका रुग्णाच्या भेटीसाठी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गेल्या असता तेथे परिसरात आणि वेगवेगळ्या विभागात प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसून आले. यामुळे त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट घेऊन याबाबत तक्रार केली. परिणामी, जिल्हाधिकारी शर्मांनी स्वतः हिरे रुग्णालयात पाहणी करुन तेथील अस्वच्छतेबाबत संबंधितांना जाब विचारला.
साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजूळा गावीत, शिवसेना प्रमुख डॉ. तुळशिराम गावित, महानगर प्रमुख सतीष महाले हे मंगळवारी दुपारी एका रुग्णाच्या भेटीसाठी भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात गेले होते. यावेळी त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात सर्वच विभागात प्रचंड धाणीचे साम्राज्य दिसून आले. यामुळे त्यांनी हिरे शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.अरुण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकरम खान व इतर अधिकार्यांना स्वच्छतेबाबत विचारपूस केली.
हिरे रुग्णालयातील सर्वच विभागात दिसून आलेली अस्वच्छता, दुर्गंधी, घाण पाहून आमदार गावित यांनी संताप व्यक्त केला. तसेच महानगर प्रमुख सतीष महाले यांनीही तेथील अस्वच्छतेबाबत अधिकार्यांना खडेबोल सुनावले. यानंतर आ. गावित यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत हिरे रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी तातडीने हिरे रुग्णालयाची पाहणी करुन तेथील डॉक्टरांसह अधिकार्यांची कानउघाडणी केली. या ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहिम राबविण्याबाबत सूचनाही दिल्यात.
शिवसेनेनेकडून स्वच्छतेची हमी
शिंदे गटातील आ. मंजूळा गावित यांनी मंगळवारी हिरे रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने बुधवारी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लागलीच हिरे रुग्णालयात धाव घेत आंदोलन केले. कोट्यावधींचा निधी येऊनही हिरे रुग्णालयात कुठलेच काम होत नसून हा निधी जातो कुठे? असा सवालही त्यांनी केला. हिरे रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच ओरड असते. परंतू, हिरे रुग्णालय प्रशासन याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करते, असा आरोपही शिवसेनेने केला.
यावर उपाय म्हणून शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांसह 50 शिवसैनिक प्रत्येक आठवड्यात या रुग्णालयातील प्रत्येक वार्डात स्वच्छता मोहीम राबविणार आहे. तसेच शिवसेना या रुग्णालयाच्या अधिकार्यांना वेळोवेळी स्वच्छतेबाबत सुचित करणार आहे. तथापि, बुधवारी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतूल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, गुलाब माळी आदी कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला.