हरकती व सूचना मागवणार
विरोधी पक्षनेते रवी राजा यांना निवडणूक आयोगाकडून पत्र

@maharashtracity

मुंबई: मुबई महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीपूर्वी प्रारूप प्रभाग रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.

या प्रभाग रचना बदलाचा मोठा फटका पालिकेत सत्ताधारी शिवसेनेपाठोपाठ (Shiv Sena) दुसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपाला (BJP) बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपने मुंबई महापालिकेच्या (BMC) फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्तेचा वापर करून तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता (Ajoy Mehta) यांच्यासोबत बैठक करून प्रभाग रचनेत फेरबदल केले होते. त्यामुळेच भाजपला ४० -५० जागांचा फायदा झाला.

भाजपने जे काही फेरबदल केले त्यामुळे त्याचा फटका शिवसेना, काँग्रेसला (Congress) बसल्याचे बोलले जाते. पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनीही, भाजपने प्रभागांमध्ये जी पुनर्रचना केली त्यामुळेच भाजपला ५० जागांचा फायदा झाला असल्याने आता पुन्हा एकदा या प्रभागांची फेररचना करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पालिका निवडणुकीपूर्वी किमान ५० प्रभागांची पुनर्रचना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने रवी राजा यांना त्या पत्राचे उत्तर पाठवले असून त्यामध्ये निवडणुकीपूर्वी प्रारूप प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट कळवले आहे.

प्रारूप प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार असल्याचे कळवले आहे. तसेच, या हरकती व सूचना यांची नोंद घेऊन त्यांचे निराकरण केल्यानंतर पालिका निवडणुकीचा प्रक्रिया सुलभ पद्धतीने मार्गी लावण्यात येणार आहे.

भाजपला याबाबतची खबर लागल्याने भाजपने तात्काळ निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राजकीय दबावाखाली आयोगाने प्रभाग पुनर्रचना करण्याचा निर्णय घेऊ नये, असे सूचित करतानाच तसे झाल्यास भाजप कोर्टात दाद मागणार असल्याचा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here