@maharashtracity

पूरग्रस्त जिल्ह्यात ट्रेसिंग, ट्रेकिंग टेस्टिंग तीव्र
झिकाला प्रतिबंधात्मक उपाय सुरु
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: राज्यात आढळलेला झिका रूग्ण, चार जिल्ह्यात वाढती कोविड रुग्णांची संख्या आणि तिसरी लाट यावर प्रतिबंधात्मक अंमलबजावणीचे कडक निर्णय घेतले जात असून घाबरून न जाता कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पुन्हा एकदा केले. दरम्यान झिका प्रसार किंवा रूग्ण संख्ये बाबत घाबरून न जाण्याचे ही आवाहन करण्यात आले.

दरम्यान बुधवारी प्रसार माध्यमांसमोर बोलताना टोपे यांनी सांगितले की, झिका महिला रूग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आढळून आला असला तरी झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्वी पासून राज्यात आरोग्य विभागाकडून सुरु आहे. शिवाय केंद्राची तीन सदस्यीय टिम आली असून या टिम कडून प्रतिबंधात्मक सूचना देण्यात येत आहेत.

या अंतर्गत भांडी कोरडी ठेवण्याच्या सूचना, फवारणी तसेच एडिस, लार्व्हा नष्ट करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही. ताप येणे, डोळे लाल होणे सारखी लक्षण दिसल्यास लक्षणाप्रमाणे उपचार केले जात आहेत. झिकाचे संक्रमण किंवा झिका रूग्ण आढळले नसून वेगात प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु आहे.

कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सातारा या चार पूरग्रस्त जिल्ह्यात कोरोना ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि टेस्टिंग तीव्र करण्यात आली असून सर्व रूग्ण विलगीकरण करण्यात येत आहे. या चार जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु असून ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे अशा जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यात आले आहे. केंद्राकडून येणाऱ्या लसींचा पुरेपूर वापर होत असून सर्व प्रथम दोन डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

तिसरी लाट कधी येईल असा अंदाज करू शकत नाही. मात्र, आतापर्यंत सण उत्सव येऊन गेल्यावर रूग्ण संख्या वाढते असे ध्यानात आल्याचे टास्क फोर्स तज्ज्ञांकडून सांगण्यात आले असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सण उत्सव आणि तिसरी लाट थोपविणे यातील सुवर्णमध्य साधला जावा, असे निर्णय घेण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here