@maharashtracity
मुंबई: बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यास निलंबित करण्याचा निर्णय ज्या बैठकीत घेण्यात आला होता, त्या निलंबन आढावा बैठकीत मांडलेला प्रस्ताव आणि त्यास दिली आलेली मंजुरी बाबत पोलीस मुख्यालयात झालेल्या अनिल गलगली यांच्या आव्हान अपील सुनावणीत आता माहिती देण्यास मुंबई पोलीस अनुकूल झाली आहे तसेच अश्या प्रकारच्या बैठकीचा इतिवृत्तांत पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
मुंबई पोलीसांच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांस ज्या निलंबन आढावा बैठकीनंतर पोलीस सेवेत रुजू करण्यात आले त्या निलंबन आढावा बैठकीची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना देण्यास मुंबई पोलीसांनी आधी सपशेल नकार दिला होता.
अनिल गलगली यांनी अश्याप्रकारे माहिती नाकारण्यात आल्यानंतर प्रथम अपील दाखल केले आहे. मंगळवारी पोलीस मुख्यालयात उपायुक्त एन अंबिका यांच्या समक्ष अनिल गलगली यांनी म्हणणे मांडले की निलंबन आढावा बैठकीत निर्णय घेतला गेला असल्यामुळे प्रस्तावावर निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे माहिती देण्यास हरकत नसावी. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 अंतर्गत निलंबन आढावा बैठकीचा निर्णय आणि इतिवृत्तांत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येण्याची आवश्यकता असल्याचे गलगली यांचे म्हणणं होते. एन अंबिका यांनी माहिती देण्यास अनुकूलता दाखविली असून पोर्टलवर माहिती टाकण्यास त्या सकारात्मक होत्या.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे 8 एप्रिल 2021 रोजी ऑनलाईन अर्ज करत माहिती मागविली होती. पोलीस आयुक्त स्तरावरील दिनांक 5 जून 2020 रोजीचे निलंबन आढावा बैठकीत सपोनि सचिन वझे यांना सेवेत पुन:स्थापित करण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय आणि तसा सादर झालेल्या प्रस्तावाची प्रत देण्याची मागणी होती.
तसेच निलंबन आढावा बैठकीत झालेल्या निर्णयावर मुख्यमंत्री, गृह मंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत यांपैकी कोणत्या स्तरावर शिक्कामोर्तब करण्यात येते, त्याची माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांस माहिती देण्यास नकार देत कळविले की शासन परिपत्रक दिनांक 17 ऑक्टोबर 2014 आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 8(1)(ञ) मधील तरतुदीनुसार सदरची माहिती नाकारण्यात येत आहे.