मुंबई महापालिका ‘ डिजिटल वर्ग’ सुरू करण्यासाठी ३६.७९ कोटी रुपये खर्चणार

@maharashtracity

मुंबई: जगभरात डिजिटल शिक्षणाचा (Digital Education) बोलबाला आहे. मुंबई महापालिकेनेही (BMC) शैक्षणिक क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याच्या दिशेने आपली पावले टाकली आहेत. पालिका आपल्या शाळांमधील १३०० वर्ग खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिजिटल वर्ग’ (Digital Classroom) सुरू करणार आहे.

त्यामुळे आता पालिकेतील लाखो विद्यार्थी नामांकित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक शिक्षण घेऊ शकणार आहेत. या कॉम्प्युटर युगात त्यांचा शैक्षणिक व बौध्दिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊन त्यांना पुढे सरकारी, खासगी नोकरी, उद्योग, व्यवसाय करणे अधिक सुकर होणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थापत्य समिती (उपनगरे)च्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Chief) व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि युवानेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे जास्त आग्रही राहिले असून ते सतत पाठपुरावा करीत होते. त्यामुळेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे काही वर्षांपूर्वी व्हर्च्युअल क्लासरूम’ च्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले. तसेच पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी ‘ टॅब’ द्वारे शिक्षण घेण्यासाठीही दालन उघडण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमध्ये ‘डिजिटल वर्ग’ सुरू करण्याची फक्त चर्चा सुरू होती. मात्र आता प्रत्यक्षात पालिका शाळांमध्ये ‘डिजिटल वर्ग’ सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यामध्ये पालिकेच्या १३०० वर्गात कार्यादेश मिळाल्यापासून पुढील सहा महिन्यात ‘डिजिटल वर्ग’ तयार करून त्यांचा पुरवठा करणे, त्यामध्ये इंटरॅक्टिव पॅनल ( एलईडी), यूपीएस व इ- लर्निंग आणि मल्टीमिडिया कंटेंट (इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत), उभारणी, चाचणी व कार्यान्वित करणे आदी कामांसाठी कंत्राटदार मे. बेनेट कोलमन अँड कंपनी लि.याला ३६ कोटी ७९ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

इंटरॅक्टिव पॅनलद्वारे शिक्षण

वर्गातील विद्यार्थ्यांना खास अभ्यासक्रम देण्यात येणार असून त्यामध्ये कोडी, अँनिमेशन, गेम्स आदी माध्यमांतून शिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच, व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, स्पिकर्स या यंत्रणांच्या सहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येणार आहे.

पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना या डिजिटल वर्गाबाबत व शिक्षण याबाबत ६ महिन्यांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी, हे डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जाणार असून त्यासाठी इंटरॅक्टिव पॅनल ( एलईडी)चा वापर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सिटी च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

तसेच, या पॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक धडे चांगलेच स्मरणात राहणार असून त्यांचे पुनर्भरण होणार आहे. त्याचप्रमाणे, या पॅनलचा वापर करून विद्यार्थ्यांची परीक्षाही घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here