Twitter : @maharashtracity
मुंबई: एखादे औषध रुग्णालयाला जोडून असलेल्या औषध दुकान व्यतिरिक्त (medical stores) बाहेरील अन्य औषध विक्रेत्याकडे कमी किमतीत उपलब्ध असल्यास त्या दुकानातून औषध खरेदी होऊ शकते. आता रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांतूनच औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाकडून (FDA) देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण (patients) आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा १ ९ ४० अंतर्गत नियमांचा दाखला देऊन अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) कडून या बाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी याबाबतचे पत्र नुकतेच प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त, सहायक आयुक्त आणि औषध निरीक्षक (औषधे ) यांना या पत्राच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. या बाबतीत अभिमन्यू काळे यांना भेटून अंमलबजावणी संदर्भातील बैठक लावून (एफडीए) निरीक्षकांच्या समक्ष सामान्य लोकांच्या आणि अडीअडचणी आदि प्रश्नांची यादी काळे यांना देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांनी सांगितले.
“कोणत्याही नोंदणीकृत औषध विक्रेत्याकडून रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय औषध खरेदी करू शकतात. रुग्णाला किंवा त्यांचा कुटुंबियांना अडचण येत असेल तर प्रथम पोलिसांना कॉल करा. अन्यथा या बाबतीत आम्हांला संपर्क करून लेखी माहिती द्या.”
– भिमेश मुतुला, राज्य सचिव,
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना.