पंचसुत्रीचा अवलंब करण्याचे यंत्रणांना आदेश

Twitter : @maharashtracity

मुंबई: चीनमधील बीएफ.७ हा व्हेरियंट पूर्वी भारतात आढळला असून या व्हेरियंटमुळे भिती बाळगण्याची गरज नसली तरी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे आढावा बैठकीत आदेश देण्यात आले.  कोविड अनुरुप काळजी आणि लसीकरण यावर भर द्यावा असे बैठकीतून सुचविण्यात आले आहे. 

दरम्यान, मास्क सक्ती नाही. मात्र वरिष्ठ नागरिक आणि जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे हितावह ठरेल, असे सुचविण्यात आले आहे. जगातील सध्या कोविड संबंधित स्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत कोविड प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव संजय खंदारे यांनी राज्य, भारत व जागतिक कोविड परिस्थितीचा तुलनात्मक अहवाल सादर केला. बैठकीत तुर्तास टेस्टींग, ट्रॅकिंग, ट्रीटींग, वॅक्सीनेटींग आणि कोविड अनुरुप वर्तन या पंचसुत्रीचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

राज्यात कोविड रुग्णसंख्या घटली 

दरम्यान, राज्यात मागील काही आठवड्यांपासून कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे शेकडा प्रमाण ०.२९ एवढा कमी आहे. संसर्ग होऊन रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही घटत असून मागील आठवड्यात राज्यात १६ रुग्ण भरती झालेले आहेत. तर गुरुवारपर्यंत राज्यात एकूण १३४ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. 

राज्यातील कोविड स्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन, जपान, अमेरिका आणि ब्राझील देशांत रुग्ण वाढत आहेत. तसेच चीनमध्ये रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोविड विषाणू बीएफ.७ व्हेरियंट अधिक वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत प्रयोगशाळा वाढवून चाचण्यांवर भर देण्यात येणार असल्याचे ठरले आहे. प्रत्येक जिल्हा मनपाने आपले टेस्टिंग वाढवावे आरटीपीसीआरचे प्रमाण वाढवण्याचे सुचित करण्यात आले आहे. 

नव्या व्हेरियंट वर लक्ष

प्रत्येक आरटीपीसीआर बाधीत नमुना (टीसी व्हॅल्यू ३० पेक्षा कमी) जनुकीय क्रमनिर्धारणसाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे नव्या व्हेरियंटकडे लक्ष देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील कोविड लसीकरण अधिक वेगाने होणे आवश्यक असून अतिरिक्त डोसकडे अधिक लक्ष देण्याचे सुचित करण्यात आले आहे. तर प्रत्येक रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील जीवनरक्षक प्रणाली, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन प्लांट सज्ज असल्याबाबतची खातरजमा करुन घेण्याचे सुचित करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या थर्मल स्क्रिनिंग बाबत निर्णय घेण्यात येणार असून केंद्र सरकार सोबत समन्वय ठवून योग्य निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, पूर्वी प्रमाणे प्रवाशांपैकी रॅडंक २ टक्के प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने घेण्याबाबतही भारत सरकारसोबत चर्चा करुन ठरविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्य टास्क फोर्स स्थापन करणार 

दरम्यान, राज्य टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून सद्यस्थितीबाबत तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानेही आपल्या जिल्हा कोविड संनियंत्रण समितीची आढावा बैठक घेऊन आपल्या स्तरावरील कोविड नियंत्रण तयारी पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here