ग्रामस्तरावरही आंदोलने करणार: सत्यशोधक शेतकरी सभेची माहिती

धुळे: मोदी सरकारने कोरोना काळात केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर बसलेल्या हजारो शेतकर्‍यांची आंदोलनाची धग गेल्या आठ महिन्यापासून कायम आहे. तसेच हे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत लोक संसद सत्याग्रह सुरू असून 13 ऑगस्टपर्यंत या आंदोलनाच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेईल, त्यावर आंदोलनाची दिशा अवलंबून आहे. तसेच 15 ऑगस्ट नंतर या आंदोलनाची तीव्रता वाढविली जाणार असल्याची माहिती सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने कॉ.किशोर ढमाले व कॉ.सुभाषकाकुस्ते यांनी संयुक्तरित्या पत्रपरिषदेत दिली.

दिल्लीच्या सिंधू बॉर्डर, गाजीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर व शाहजांपूर बॉर्डर या ठिकाणी मोदी सरकारने संसदेत घाई-घाईने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात 26 नोव्हेंबर पासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. डिसेंबर जानेवारीतील कडाक्याची थंडी तसेच मे-जून मधील कडक उन्हात देखील हजारो शेतकर्‍यांचे आंदोलन अद्यापही कायम असून शेतकर्‍यांमध्ये आंदोलनाचा उत्साह कायम आहे, असे कॉ.किशोर ढमाले व कॉ.सुभाष काकुस्ते यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलक नेत्यांनी दिल्लीत लोकसंसदेचे आंदोलन सुरू केलेले आहे. संसदेत निवडून गेलेले लोक हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत लोकसंसद सत्याग्रह सुरूच राहणार आहे. 13 ऑगस्ट पर्यंत या आंदोलनाच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेईल त्यावर आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून आहे.

आता तामीळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश येथील शेतकरीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून हे आंदोलन 2024 पर्यंत सुरू रहाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात केंद्राच्या कायद्यात मामुली बदल करुन आणला आहे. हा कायदा महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पंजाब, राजस्थान, झारखंड या राज्यांनी ज्या पद्धतीने शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले व शेतकरी आंदोलनास पाठींब्याचा ठराव मंजूर करुन घेतला तसाच ठराव महाराष्ट्र सरकारने करावा, अशी आमची मागणी आहे.

9 ऑगस्टला अदिवासी दिन आणि भारत छोडो दिन आहे. त्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना किसान आंदोलनाला पाठींबा देण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रात 1 लाख पत्रके आम्ही विविध जिल्ह्यात वाटणार असल्याचे उभयतांनी याप्रसंगी सांगितले.

येत्या 14 ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहे. तसेच तलाठी व सर्कल यांना निवेदन देण्यात येणार आहे. जर आमच्या निवेदनांचा स्विकार झाला नाही तर 15 ऑगस्टला आम्ही जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेला कॉ.वंजी गायकवाड, कॉ.गोरख कुवर, कॉ.सुरेश मोरे, कॉ.शिवाजी मोरे, कॉ.युवराज ठाकरे, कॉ.यशवंत मालचे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here