@maharashtracity

कोणालाही पहिला डोस मिळणार नाही

मुंबई: कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव विशेषतः कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने मुंबईत सर्व शासकीय व पालिका लसीकरण केंद्रात ४ सप्टेंबर रोजी लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. मात्र या दिवशी कोणत्याही व्यक्तीला पहिला डोस देण्यात येणार नाही.

मुंबईत कोविड-१९ (covid-19) विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी १६ जानेवारीपासून पालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत म्हणजे १ सप्टेंबरपर्यंत ६९ लाख २६ हजार २५५ लाभार्थ्‍यांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे तर २५ लाख १७ हजार ६१३ लाभार्थ्‍यांना लसीचा दुसरा डोसही देण्‍यात आलेला आहे. मात्र लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांचे प्रमाण कमी असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, ब्रेक द चेन या अंतर्गत काही निर्बंध शिथिल करून दोन्ही डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांना उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देण्‍यात आलेली आहे.

सद्यस्थितीत, कोविड-१९ या आजाराची रुग्‍णसंख्‍या काहीशी वाढत आहे. तसेच, कोविडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ञांनी वर्तवली आहे.‍ या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे पालिकेने खास करून लसीचा दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांसाठी ४ सप्टेंबर रोजी शासकीय, पालिका स्तरावरील सर्व लसीकरण केंद्रात लसीचा फक्त दुसरा डोस देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या दिवशी शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here