@maharashtracity
विरोधकांचा राऊतांवर निशाणा
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर (BJP) आरोप केले. मात्र, राऊत यांच्या आरोपांची विरोधी पक्षाकडून थातूरमातूरच्या गोष्टी अशी टिका करुन खिल्ली उडवली.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतून काहीही निघाले नसल्याचे सांगत राऊतांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी या सर्व थातूरमातूर गोष्टी करून काही निष्पन्न होणार नाही. त्यासाठी आधी पुरावे द्या, असे सांगत खिल्ली उडवली. तसेच संजय राऊत तोंडावर आपटले असल्याचेही दरेकर म्हणाले.
किरीट सोमय्याना (Kirit Somaiya) जेलमध्ये टाका म्हणणाऱ्या राऊतांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसून सत्तेतील पक्षाने अशी मागणी करायची नसते. यातून सरकार तुमचं ऐकत नाही का? असा सवालच दरेकर यांनी उपस्थित केला. तर भाजपा नेते सुधीर मुगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले की, खोदा पहाड निकला चुहा… भाजपा हा मोठा पक्ष असून शिवसेनेच्या (Shiv Sena) ५६ जागा आहेत. राऊत यांच्या आरोपांची चौकशी केल्यास काहीही निघणार नाही. बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) आत टाकले त्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मांडीला मांडी लावून आज शिवसेना बसली आहे. तपास यंत्रणेचा आताच दबाव का वाटतो असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राऊत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे ब्ल्यू आईड बॉय् आहेत की शरद पवार (Sharad Pawar) यांचे? असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला. राऊत यांची लॉयल्टी कोणाला समर्पित आहे, असा प्रश्न यावेळी कंबोज यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, मोहित कंबोजला ओळखत नसल्याचे राऊत म्हणाले. मात्र ४ सप्टेंबर २०१७ ला राऊत माझ्या घरी आले होते. राऊत प्रत्येक वर्षी गणपतीला माझ्या घरी येतात. राऊत यांनी अनेक वेळा माझ्याकडे पैशाची मदत मागितली. तशी मदत केली असल्याचा दावा कंबोज यांनी केला.
तसेच गुरु आशिष, राकेश वाधवानकडून १२ हजार कोटी किमतीची १ लाख ६५ हजार स्क्वेअर फुटाची जमीन कंबोज यांनी घेतली असल्याचा आरोप राऊत यांनी केला. मात्र ३१० लाख प्रति स्वेअर फुट किंमतीची जमीन मुंबईतच काय संपूर्ण जगात आहे का असा सवाल यावर कंबोज यांनी केला. राऊत यांनी हर्बल तंबाखू किंवा बारामतीची वनस्पती खाऊन पत्रकार परिषद घेतली की काय अशी विचारणा कंबोज यांनी केली.