@maharashtracity

मुंबई: कोविड कमी होत असताना पालिकेकडून करण्यात येणाऱ्या सहाव्या सिरोसर्व्हे फेज २ (sero-survey) साठी अडथळे येत आहेत. सहाव्या सिरो सर्व्हे फेज १ साठी ज्या फ्रंटलाईन वर्कर्सने (frontline workers) रक्ताचे नमुने दिले, त्याच कर्मचाऱ्यांनी फेज दोन च्या सिरो सर्व्हेसाठी नमुने देणे अपेक्षित आहे. मात्र, नमुने देण्यास कर्मचाऱ्यांमध्ये अनुत्सुकता दिसून येत असल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याकडून नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात येत आहे.

सहाव्या सिरोसर्व्हे फेज १ साठी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसह आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. सहावा सिरो सर्व्हे सर्वेक्षण दोन टप्प्यात अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात बेस्ट कर्मचाऱ्यांसह डॉक्टर, परिचारिका आणि वर्ग ४ कर्मचारी सहभागी होणार होते. हा सर्व्हे मार्चमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी प्रत्येक कर्मचारी अँटीबॉडी जाणून घेण्यास उत्सुक होते. त्यामुळे त्यावेळी खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. रुग्णांच्या संपर्कात असलेल्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्याचा निकष सर्व्हेसाठी ठरविण्यात आला होता.

सहावा सिरो सर्व्हे २ चा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये करण्यात येणार होता. त्याप्रमाणे नमुने घेण्यास सुरुवात झाली. मात्र यावेळी कर्मचाऱ्यांची अनुत्सुकता अधिक दिसून येत आहे. हे कर्मचारी नमुने द्यायला समोर येत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. हे सर्व्हेक्षण नायर हॉस्पिटल (मायक्रोबायोलॉजी विभाग आणि सामुदायिक औषध विभाग) करत असून रुग्णालयात येऊन रक्ताचे नमुने द्या, फॉर्म भरा यासारखे सर्व्हेक्षणाचे सोपस्कार करण्यास सांगण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीप्रमाणे व्हीएन देसाईमधून ४२, कांदिवली शताब्दीमधून ३९, वांद्रे भाभामधून ५५, एस के पाटील ८, कुर्ला भाभामधून २६, राजावाडी हॉस्पिटलमधून ५८, तर शताब्दीमधून ३७ एवढेच नमुने गोळा झाले असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here